“भाजप नेते कधीपासून गांधीवादी झाले?”; अमोल कोल्हेंवरील टीकेवरुन शरद पवारांचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 03:36 PM2022-01-21T15:36:04+5:302022-01-21T15:38:15+5:30

शरद पवार म्हणाले की, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासावर भाष्य करु इच्छित नाही पण...

ncp sharad pawar replied bjp over amol kolhe criticism over nathuram godse role | “भाजप नेते कधीपासून गांधीवादी झाले?”; अमोल कोल्हेंवरील टीकेवरुन शरद पवारांचा थेट सवाल

“भाजप नेते कधीपासून गांधीवादी झाले?”; अमोल कोल्हेंवरील टीकेवरुन शरद पवारांचा थेट सवाल

Next

मुंबई: ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात नथुराम गोडसे (Nathuram Godse) यांची भूमिका करणारे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) नव्या वादात सापडले आहेत. त्यांचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर ३० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. राष्ट्रवादी पक्षाचे खासदार असताना गांधींची हत्या करणाऱ्या गोडसे यांचे समर्थन करणारी भूमिका तुम्ही कशी करू शकता, असा सवाल त्यांना विचारला जाऊ लागला आहे. यातच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी या प्रकरणावर सविस्तर आणि स्पष्टपणे भाष्य केले आहे. यावेळी भाजपकडून अमोल कोल्हेंवर केल्या जात असलेल्या टीकेवर बोलताना, भाजप नेते कधीपासून गांधीवादी झाले, असा थेट सवाल केला आहे. 

महात्मा गांधींवरील सिनेमा संपूर्ण जगात गाजला होता. त्या चित्रपटातही कोणीतरी नथुराम गोडसेची भूमिका केली होती. ती भूमिका ज्याने केली तो कलाकार होता, तो काही नथुराम गोडसे नव्हता. कोणत्याही चित्रपटात कलाकार एखादी भूमिका करत असेल तर कलाकार म्हणूनच त्याच्याकडे पाहावे लागेल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 

भाजप नेते कधीपासून गांधीवादी झाले?

या प्रकरणानंतर भाजप नेत्यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, भाजप नेते गांधीवादी कधीपासून झाले. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) इतिहासावर भाष्य करु इच्छित नाही. पण एक काळ असा होता की, गांधींच्या संबंधी वेगळी भूमिका घेणाऱ्या ज्या शक्ती होत्या त्या कुठे आहेत ते बघितले पाहिजे. त्यानंतर त्यांनी बोलावे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. 

एक कलाकार म्हणून त्याच्याकडे पाहिले पाहिजे

छत्रपती शिवाजी महाराजांवरील आधारीत चित्रपटात एखाद्या अभिनेत्याने औरंगजेबाची भूमिका केली म्हणजे तो मुघल साम्राज्याचा पुरस्कर्ता होत नाही. कलावंत म्हणून तो भूमिका घेतो. किंवा रामराज्यासंबंधी सिनेमा असेल, तर त्यात राम आणि रावण यांच्यातील संघर्ष दाखवला असेल, तर रावणाची भूमिका करणारी व्यक्ती रावण असू शकत नाही. एक कलाकार म्हणून त्याच्याकडे पाहिले पाहिजे. म्हणजे सीतेचे अपहरण केले याचा अर्थ प्रत्यक्ष सीतेचे अपहरण त्या कलाकारने केले, असा होत नाही. रावणाचा इतिहास त्यातून दाखवण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे अमोल कोल्हेंनी यासंबंधीची भूमिका घेतली असेल तर ती कलावंत म्हणून आहे, असे सांगत शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांची पाठराखण केली आहे. 

दरम्यान, अमोल कोल्हेंनी सन २०१७ मध्ये ही भूमिका केली तेव्हा ते आमच्या पक्षातही नव्हते. हा सिनेमा अजून बाहेरही आलेला नाही. पण कलावंत म्हणून त्यांनी ती भूमिका केली असेल तर याचा अर्थ गांधींजींच्या विरोधात काहीतरी आहे असा नाही. नथुराम गोडसेने जे काम केले आहे त्यामुळे संपूर्ण देश अस्वस्थ, नाराज, दु:खी आहे. नथुरामचे महत्त्व वाढवण्याचा यात कोणताही हेतू नाही. याकडे एक कलावंत म्हणून आणि या देशात घडलेला इतिहास समोर ठेवून पहायला पाहिजे, असेही शरद पवार म्हणाले.
 

Web Title: ncp sharad pawar replied bjp over amol kolhe criticism over nathuram godse role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.