Join us  

विद्या चव्हाण यांच्या सुनेचा खळबळजनक दावा, 'ब्लॅकमेल' करत असल्याचाही आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 12:25 PM

Vidya Chavan: या प्रकरणी भाजपाने आमदार विद्या चव्हाण यांचा राजीनामा मागितला आहे

ठळक मुद्देमाझी बदनामी करण्यासाठी विद्या चव्हाण यांच्याकडून खोटेनाटे आरोपआरोप मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव पीडित सूनेने फेटाळले आमदार विद्या चव्हाणांचे आरोप

मुंबई - सूनेचा छळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. माझ्याविरोधात केलेले आरोप बदनामी करण्यासाठी केलेत, तसेच जे पुरावे असल्याचं सांगितलं जातं आहे ते बनावट तयार करण्यात आलेत असा दावा विद्या चव्हाण यांच्या पीडित सुनेने केला आहे. 

याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना पीडित सुनेने सांगितले की, माझ्याविरोधात जे पुरावे आहेत असं सांगतात ते बनावट केलेले आहे, हे खोटे पुरावे आहेत. दुसरी मुलगी सात महिन्यांची असताना वारली तेव्हा नंतर प्रेग्नेसीसाठी तयार नव्हती. त्यानंतर त्यांना कळालं की, माझ्यापासून त्यांना मुलगा होणार नाही, मी मोठी सून असल्याने वारस मिळणार नाही त्यामुळे त्यांनी माझा छळ करायला सुरुवात केली असा आरोप पीडित सुनेने आमदार विद्या चव्हाण आणि कुटुंबीयांवर केला आहे. 

तसेच १६ जानेवारीला दीराने माझा विनयभंग केल्याची तक्रार केली होती. त्यानंतर २२ जानेवारीला मी कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली. माझी बदनामी करण्यासाठी विद्या चव्हाण यांच्याकडून खोटेनाटे आरोप करण्यात येत आहेत. आमदारकीची ताकद वापरुन मला माझ्या मुलीपासून तोडलं. तुला तुझी मुलगी सुखरुप हवी असेल तर आरोप मागे घे, असा दबाव माझ्यावर टाकण्यात येत आहे असा आरोप पीडित सुनेने विद्या चव्हाण कुटुंबीयांवर केला आहे. 

सुनेचा छळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाणांसह कुटुंबीयांविरोधात FIR दाखल 

पीडित सुनेने आमदार विद्या चव्हाण, त्यांचे पती अभिजित, मुलगा अजित (पीडितेचा पती), मुलगा आनंद (पीडितेचा दीर) आणि शीतल चव्हाण (आनंदची पत्नी) यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आलं आहे. पीडितेला पहिली मुलगी आहे. त्यानंतर दुसरीसुद्धा मुलगीच झाल्यानंच विद्या चव्हाण कुटुंबीय पीडितेचा छळ करत होते. पीडित मुलीने विद्या चव्हाण यांच्या घरी ठेवलेल्या तिच्या मौल्यवान वस्तूंचीही मागणी केली आहे. विशेष म्हणजे महिलांवर अन्याय झाल्यावर तत्परतेने पुढे येणाऱ्या विद्या चव्हाण याच सुनेचा छळ करत असल्याची बातमी आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. 

विद्या चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा; भाजपची मागणी

या प्रकरणी भाजपाने आमदार विद्या चव्हाण यांचा राजीनामा मागितला आहे. भाजपा नेत्या माधवी नाईक म्हणाल्या की, महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या विद्या चव्हाण यांचा खरा चेहरा आज सगळ्यांसमोर आलेला आहे. सुनेने गुन्हा दाखल केल्यानंतर सुने विरोधातच आक्षेपार्ह विधान करणेही निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी घटनेची दखल घेऊन कठोर कारवाई करावी. चव्हाण यांच्या वर्तनामुळे विधिमंडळाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. त्यामुळे विद्या चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. 

सुनेबाबत विद्या चव्हाणांचं धक्कादायक विधान, स्वत:वरील आरोप फेटाळले

काय म्हणाल्या होत्या विद्या चव्हाण?माझ्या सुनेचे विवाहबाह्य संबंध आहेत, सुनेच्या मोबाइलमधील चॅट आणि इतर बाबींवरून तिचे विवाहबाह्य संबध असल्याचं आमच्या निदर्शनास आलं. माझ्या मुलाने यासंदर्भात पुरावे गोळा केले आणि त्याने घटस्फोटासाठी वकीलांशी संपर्क साधला. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे, त्यामुळे याबाबत मी जास्त बोलणार नाही, अशी प्रतिक्रियाही विद्या चव्हाण यांनी दिली होती.  

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसपोलिसभाजपा