रश्मी शुक्लांना फोन टॅपिंगची घाणेरडी सवय; जितेंद्र आव्हाडांचे गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 20:10 IST2021-03-24T20:06:52+5:302021-03-24T20:10:27+5:30
ncp leader jitendra awhad makes serious allegations on rashmi shukla over phone tapping: मंत्र्यांचे फोन टॅप झाल्याची जितेंद्र आव्हाडांना शंका; रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप

रश्मी शुक्लांना फोन टॅपिंगची घाणेरडी सवय; जितेंद्र आव्हाडांचे गंभीर आरोप
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. रश्मी शुक्लांनी वेगळ्याच नाव्यांनी परवानग्या घेऊन अनेक मंत्र्यांचे फोन टॅपिंग केल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारादेखील त्यांनी दिला.
कोणत्याही व्यक्तीचा फोन टॅप करायचा असल्यास त्यासाठी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांची परवानगी लागते. रश्मी शुक्ला यांनी अशा प्रकारची परवानगी घेतली होती का, तर या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. सीताराम कुंटेंनी हे उत्तर दिलं आहे. रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग करायची घाणेरडी सवय आहे. आधीचं सरकार असतानादेखील त्यांनी एकदा असा प्रकार केला होता. त्यावेळी एक पत्र उघडकीस आलं होतं. त्यावेळी त्यांनी चूक झाल्याची कबुली देत माफी मागितली होती, असं आव्हाड यांनी सांगितलं.
रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग करायला कोणी सांगितले?; राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर
परवानगी एकाचे फोन टॅप करण्यासाठी घ्यायची आणि फोन टॅपिंग मात्र दुसऱ्याच व्यक्तीचे करायचे, असे उद्योग रश्मी शुक्लांनी केले आहेत. आता त्याचा उपयोग महाविकास आघाडी सरकारविरोधात केला जात आहे. फोन टॅपिंग हा गुन्हा आहे. फोन टॅप कोणाचे करायचे याच्या काही मार्गदर्शक सूचना आहेत. एखादी व्यक्ती देशविघातक कृत्य करत असेल, परदेशातील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असेल, देशाच्या शांततेला बाधा आणणाऱ्या कारवाया करत असेल, तर फोन टॅपिंग करण्यात येतं. पण शुक्ला यांनी कोणतेही नियम न पाळता केलेलं फोन टॅपिंग हा राईट टू प्रायव्हसीचा भंग आहे, असं आव्हाड म्हणाले.