Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मलाही वाटते मी जनतेच्या मनातील भारताचा पंतप्रधान'; राज ठाकरेंच्या बॅनरवरुन आव्हाडांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 16:04 IST

गुढीपाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज ठाकरे यांची जाहीर सभा त्याच शिवाजी पार्कवर होते. 

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा आज शिवाजी पार्कवर होत आहे. आपल्याला जे काही बोलायचे आहे ते आपण २२ मार्च रोजी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्क वरून बोलू, असे सांगत राज ठाकरे यांनी एका नव्या चर्चेला सुरुवात करून दिली आहे. दरवर्षी दसऱ्याला उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होतो. गुढीपाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज ठाकरे यांची जाहीर सभा त्याच शिवाजी पार्कवर होते. 

गुडीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे कोणत्या दिशेने गुढी उभारणार? हा राज्यातील राजकीय नेते, कार्यकर्ते यांना पडलेला प्रश्न आहे. मात्र या सभेआधी शिवसेना भवनासमोरील एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले. जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलेला आहे. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी हा बॅनर सभास्थळी लावण्यात आला आहे. 

सध्या मनसेच्या या बॅनरवरुन विविध राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत, असं जर त्यांना वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे. मलाही वाटते मी जनतेच्या मनातील भारताचा पंतप्रधान आहे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. 

दरम्यान, टाळी एका हाताने वाजत नाही, किंवा आग लागल्याशिवाय धूर निघत नाही... या म्हणींची प्रचिती राज ठाकरे यांच्या आजच्या भाषणातून येईल. तुम्ही चुका करायच्या. तुम्ही कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचे. त्यांची विचारपूस करायची नाही, पक्ष सोडून लोक जाऊ लागले की आपल्या अपयशाचे खापर त्यांच्यावर फोडायचे. हे कसले राजकारण? असा सवाल किंवा अशी मांडणी राज ठाकरे यांच्याकडून केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्थात राज ठाकरे यांच्या भाषणानंतर या तिघांची राजकीय खेळी कशी असेल याचे अंदाज बांधता येतील.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम

टॅग्स :राज ठाकरेजितेंद्र आव्हाडमनसेराष्ट्रवादी काँग्रेस