Join us

“काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो, पण...”; जयंत पाटील नेमके काय बोलले? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 13:25 IST

एकीकडे जितेंद्र आव्हाड यांना विरोधी पक्षनेता केले असताना, दुसरीकडे काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे.

Jayant Patil News: अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्याच्या राजकारणात मागील साडेतीन वर्षांत तिसरा महाभूकंप झाला. यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षनेता आणि प्रतोद पदाचे पत्र घेऊन ते राहुल नार्वेकरांकडे सोपविले. यानंतर आता अजित पवार यांच्या गटानेही प्रतोद निवडला आहे. या घडामोडींमध्ये काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो, असे सूतोवाच केले आहे. 

मीडियाशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ज्या ९ जणांनी आमच्या पक्षाच्या धोरणाविरोधात जाऊन भाजपाबरोबर शपथ घेण्याचे काम केले त्याच क्षणी ते ९ जण अपात्र ठरतात. त्यासंबधातील याचिका आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केली आहे. याबाबत मी सकाळी विधानसभा अध्यक्षांशी सविस्तर बोललो. आमची याचिका त्यांना मिळाली असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. ते त्यावर विचार करत आहेत, असेही त्यांनी सांगितले. आमचे म्हणणे मांडू द्यावे अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. 

काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो, पण...

काही आमदार शरद पवार साहेबांना भेटायला गेले आहेत. राहिला प्रश्न आमच्याबरोबर किती लोक आहेत याचा तर आमच्याबरोबर सध्या ५३ वजा ९ म्हणजेच ४४ आमदार आहेत. आमची संख्या सध्या ९ जणांनी (आमदारांनी) कमी झाली आहे. कारण ते (शपथ घेणारे आमदार) आता गेलेलेच आहेत. उरलेले आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच आहेत, असे जयंत पाटील म्हणाले. यावेळी काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केल्याबाबत जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर, विधानसभेचे अध्यक्ष संख्याबळानुसार निर्णय घेतील. आमची संख्या ९ जणांनी कमी झाली आहे, कारण ते गेलेल आहेत. उरलेले आमदार राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहेत. आम्हाला काँग्रेस पक्षाशी वाद करायचा नाही. आम्ही बसून निर्णय घेऊ. आमची संख्या कमी असेल तर काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो, यासाठी काही दिवसांचा कालावधी जाऊ शकतो.

दरम्यान, आम्हाला कोणावर अन्याय करायचा नाही. त्यांना परत येण्याकरता आम्ही पूर्ण संधी देऊ. परंतु, जे येणार नाहीत. जे पार्टीची लाईन सोडून जातात (पक्षाच्या धोरणाविरोधात काम करतात) त्यांच्यावर आवश्यक कारवाई आम्ही करू. सगळेच आमदार नाहीत, परंतु, बहुतेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :महाराष्ट्रातील सत्तासंघर्षजयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस