संभाजीनगरला जावा किंवा अयोद्ध्याला; मात्र चेहऱ्यावर 'अध्यात्मिक आनंद' झळकू द्या; मिटकरींचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 15:01 IST2022-04-17T14:55:43+5:302022-04-17T15:01:05+5:30
राज ठाकरेंच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी निशाणा साधला आहे.

संभाजीनगरला जावा किंवा अयोद्ध्याला; मात्र चेहऱ्यावर 'अध्यात्मिक आनंद' झळकू द्या; मिटकरींचा टोला
मुंबई- आगामी ५ जून रोजी मी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी आज केली. तसेच १ मे म्हणजेच महाराष्ट्रदिनी औरंगाबादमध्ये मनसेची जाहीर सभा होणार असल्याची माहिती देखील राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
राज ठाकरेंच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी निशाणा साधला आहे. तुम्ही संभाजीनगरला जा, अयोध्येला जा, मात्र श्रीरामाचे दर्शन घेताना आत्मीयेतेने दर्शन घ्या, चेहऱ्यावर सात्विक भाव येऊ द्या, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. तसेच हनुमान चालीसाच्या दोन ओळीही राज ठाकरेंना म्हणता येत नाही, असा टोलाही अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.
आजच्या पत्रकार परिषदेत स्क्रीनचा खर्च वाया गेला. बहुतेक पेन ड्राईव्ह घरीच विसरले असावेत. संभाजीनगर ला जा किंवा योद्ध्याला मात्र चेहऱ्यावर "अध्यात्मिक आनंद" झळकु द्या.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 17, 2022
राज ठाकरे यांनी हे दंगली भडकविण्याचे काम करीत आहे. राज्याला फुले, शाहू यांची परंपरा आहे. देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले आहे. कायद्याचे राज्य आहे. कायद्याने राज्य चालते. हिंदू, मुस्लीम यांना शिक्षणाचे, बेरोजगारीचे दरवाढीचा प्रश्न महत्वाचे आहे, असं अमोल मिटकरी यांनी यावेळी सांगितलं.
मुस्लिमांच्या प्रार्थनेला विरोध नाही- राज ठाकरे
राज ठाकरे पुढे म्हणाले की, "आमचा मुस्लिमांच्या प्रार्थनेला काहीच विरोध नाही. आमचा विरोध भोंग्याला आहे. मला देशातली शांतता भंग करायची नाही. मुस्लिमांनीही माणुसकीच्या नजरेने पाहावे. त्यांनी प्रार्थना कराव्या, पण लाउडस्पीकरवरुन ऐकवणार असलीत, तर त्यांनाही आमच्या आरत्या ऐकाव्या लागतील," असेही राज ठाकरे म्हणाले.
...तर आमचेही हात बांधले नाहीत- राज ठाकरे
मुस्लीम बांधवांनी हा विषय धर्मावर नेऊ नये. सामाजिक विषय आहे. भोंग्याच्या आवाजामुळे लहान मुले, विद्यार्थी यांनाही त्रास होतो. आमच्या मिरवणुकीवर तुम्ही दगडफेक करणार असाल तर आमचेही हात बांधले नाहीत असा इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे. केवळ हिंदूनाच नव्हे तर मुस्लीमांनाही आवाजाचा त्रास होत असल्याचं राज ठाकरेंनी सांगितले आहे.