Join us

विधानसभा उपाध्यक्षपद अजित पवार गटाला? राजकुमार बडोले, अण्णा बनसोडे यांची नावे चर्चेत

By यदू जोशी | Updated: March 5, 2025 05:41 IST

विधानसभेचे रिक्त असलेले उपाध्यक्षपद अजित पवार गटाला याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात मिळण्याची शक्यता आहे.

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विधानसभेचे रिक्त असलेले उपाध्यक्षपद अजित पवार गटाला याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात मिळण्याची शक्यता आहे. हे पद मागासवर्गीय समाजातील आमदाराला देण्याचा मतप्रवाह पक्षात असून, त्यामुळे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे आणि अर्जुनी मोरगावचे (जि. गोंदिया) राजकुमार बडोले यांची नावे चर्चेत आहेत. 

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीचे सरकार असताना १४ मार्च २०२० रोजी राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. एकनाथ शिंदे सरकारच्या काळातही तेच या पदावर राहिले.  अलीकडच्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा विजयी झाले आणि देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये अन्न व औषधी प्रशासन मंत्री झाले.    

नवीन सरकारमध्ये हे पद अद्याप भरलेले नाही. विधानसभेचे अध्यक्षपद  आणि विधान परिषदेचे सभापतीपद हे भाजपकडे आहे. विधान परिषदेच्या उपसभापती शिंदेसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे आहेत. महायुतीत फक्त अजित पवार गटाकडेच दोन्ही सभागृहांतील पद नाही. त्यामुळे आता विधानसभा उपाध्यक्षपद या पक्षाकडे जाईल, असे मानले जाते. 

अण्णा बनसोडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटचे मानले जातात. राजकुमार बडोले यांच्यासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल आग्रही असल्याची माहिती आहे. उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला फार पूर्वी दिले जात असे पण ती परंपरा कधीच मोडीत निघाली आहे.

अनुसूचित जातीला प्राधान्य देण्याची पक्षात मागणी

राजकुमार बडोले पूर्वी भाजपमध्ये होते. पण, अर्जुनी मोरगाव मतदारसंघ अजित पवार गटाच्या वाट्याला गेल्यानंतर बडोले यांना या गटात प्रवेश देऊन निवडून आणले गेले. ते २०१४ ते २०१९ या काळात सामाजिक न्याय मंत्री होते. पिंपरी आणि अर्जुनी मोरगाव हे दोन्ही अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ आहेत. अजित पवार गटाच्या मंत्र्यांपैकी एकही मंत्री अनुसूचित जातींचा नाही. झिरवाळ यांच्या रुपाने पक्षाने आदिवासी नेत्याला संधी दिली आहे. हसन मुश्रीफ हा मुस्लीम चेहराही आहे. त्यामुळे निदान विधानसभा उपाध्यक्षपद तरी अनुसूचित जातीला द्यावे, असा मोठा मतप्रवाह पक्षामध्ये आहे.

 

टॅग्स :विधानसभाविधान भवनमहायुतीअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस