Nawab Malik: बांग्लादेशी महिलांना घेऊन डान्सबार चालवायचे, भाजपचा मलिकांवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 16:54 IST2022-02-24T14:58:53+5:302022-02-24T16:54:38+5:30
मुंबईतील भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Nawab Malik: बांग्लादेशी महिलांना घेऊन डान्सबार चालवायचे, भाजपचा मलिकांवर गंभीर आरोप
मुंबई - राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने अटक केली आहे. बुधवारी पहाटे ५ वाजता ईडीचे अधिकारी मलिकांच्या घरी पोहचले होते. त्यानंतर ७ वाजल्यापासून नवाब मलिकांची ईडीकडून चौकशी सुरु होती. ८ तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्या आली. ईडीने मलिकांना विशेष कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. मलिकांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप नेते मलिकांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
मुंबईतील भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर, मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्री नवाब मलिक यांच्यावर आणखी गंभीर आरोप केले आहेत.
महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला हे ऐकून आश्चर्य वाटेल, की महाराष्ट्रातील एक मंत्री डान्सबार चालवत होता. बांग्लादेशी मुलींना मुंबईत आणून त्यांना वेश्याव्यवसायात ढकलत होता, डान्स बार चालवत होता. हे काम नवाब मलिक यांनी केलं आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. 'आम्ही अनेक मुलींची स्टिंग ऑप्रेशन्स केली असून त्यामध्ये मुलींनी नवाब मलिकांनी आपल्याला जबरदस्तीने वेश्या व्यवसायामध्ये ढकलल्याची कबुली दिलीय. हे पुरावे आपण लवकरच तपास यंत्रणांकडे देणार असल्याचंही ते म्हणाले.
मलिकांच्या जायवयावरही आरोप
कंबोज यांनी मलिक यांच्यासह त्यांच्या जावयावरही हल्लाबोल केला आहे. नवाब मलिक यांचे संबंध दाऊद इब्राहिम, हसीना पारकर, छोटा शकील यांच्यासोबत आहेत. तर, त्यांच्या जावयाचे संबंध आंतरराष्ट्रीय ड्रग्ज पेडलरसोबत आहेत, असा आरोपही कंबोज यांनी केला आहे. कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन मलिक यांच्यावर निशाणा साधला. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही कंबोज यांनी केली.