राष्ट्रवादीचा 'मास्टरस्ट्रोक'! डॉक्टर, इंजिनिअर्ससह उत्तर भारतीयांना संधी, मलिक म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 17:30 IST2026-01-02T17:27:05+5:302026-01-02T17:30:03+5:30
Nawab Malik: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) कंबर कसली असून पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी आज मुंबईतील रणनीती स्पष्ट केली.

राष्ट्रवादीचा 'मास्टरस्ट्रोक'! डॉक्टर, इंजिनिअर्ससह उत्तर भारतीयांना संधी, मलिक म्हणाले...
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) कंबर कसली असून पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी आज मुंबईतील रणनीती स्पष्ट केली. "ज्या प्रभागांमध्ये राष्ट्रवादी ताकदीने लढू शकते, तिथे आम्ही आमचे उमेदवार जाहीर केले आहेत," असे सांगत मलिकांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस अधिक जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला.
नवाब मलिक यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवारी यादीचे वैशिष्ट्य सांगितले. त्यांच्या पक्षाने डॉक्टर, इंजिनिअर, वकील आणि इतर प्रोफेशनल्स लोकांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच यावेळच्या यादीत महिला उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. मराठी भाषिक, भूमिपुत्र आणि मुंबईला आपली कर्मभूमी मानणाऱ्या प्रत्येक घटकाला, तसेच सर्वधर्मीय लोकांना न्याय देण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे. अनेक पक्ष उत्तर भारतीयांना केवळ आपली मतपेढी समजतात, पण राष्ट्रवादीने मुंबईत सर्वाधिक उमेदवारी उत्तर भारतीय लोकांना दिली.
निवडणूक जाहीर झाल्यापासून नवाब मलिकांच्या नावावरून महायुतीमध्ये प्रचंड ओढाताण सुरू होती. यावर भाष्य करताना मलिक म्हणाले की, "मी अजित पवारांचे आभार मानतो. काही लोक माझ्या नावाने 'बोंबाबोंब' करत होते आणि 'मलिक असतील तर युती तोडू' अशा धमक्या देत होते. मात्र, अजित पवारांनी कोणाचेही दडपण न घेता मुंबईत स्वबळावर लढण्याचा स्वाभिमानी निर्णय घेतला."
नवाब मलिक यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवरही शंका उपस्थित केली आहे. निवडणूक अधिकारी नियम धाब्यावर बसवून अपात्र उमेदवारांना पात्र ठरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक अधिकाऱ्यांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत १४ पेक्षा जास्त जागा जिंकू शकत नाही, असा अभास निर्माण केला जातो. पण यावेळी चित्र वेगळे असेल. आम्ही योग्य चर्चा करून आणि प्रभागांची गणितं मांडून उमेदवार दिले आहेत. त्यामुळे यंदा राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील.