Narayan Rane : करारा जवाब मिलेगा... नितेश राणेंकडून व्हिडिओ शेअर करत शिवसेनेला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 13:20 IST2021-08-25T13:19:55+5:302021-08-25T13:20:44+5:30
नारायण राणेंना मंगळवारी रात्री उशिरा न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. नारायण राणेंच्या सुटकेनंतर भाजपा नेते आणि राणे समर्थक यांनी जल्लोष केला. तर, राणेपुत्रांनी शिवसेनेला थेट इशाराच दिला आहे.

Narayan Rane : करारा जवाब मिलेगा... नितेश राणेंकडून व्हिडिओ शेअर करत शिवसेनेला इशारा
मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात केलेल्या प्रक्षोभक विधानानंतर काल पोलिसांनी नारायण राणेंवर अटकेची कारवाई केली होती. दरम्यान, महाड न्यायालयाकडून राणेंना जामीन मिळाला असला तरी या निमित्ताने शिवसेना आणि राणेंमध्ये निर्माण झालेला वाद पुढचे काही दिवस धुमसत राहण्याची शक्यता आहे. राणेंच्या अटकेमुळे राणेपुत्र चांगलेच खवळले असून शिवसेनेला थेट इशारा देत आहेत. माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे. तर, नितेश राणेंनी थेट इशाराच दिलाय.
नारायण राणेंना मंगळवारी रात्री उशिरा न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. नारायण राणेंच्या सुटकेनंतर भाजपा नेते आणि राणे समर्थक यांनी जल्लोष केला. तर, राणेपुत्रांनी शिवसेनेला थेट इशाराच दिला आहे. आमदार नितेश राणे यांनी राजनिती चित्रपटातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत मनोज वाजपेयी यांचा डायलॉग आहे. आभाळाकडे थुंकणाऱ्याला कदाचित हे माहिती नाही की, ती थुंकी त्याच्यावरच पडणार आहे, करारा जवाब मिलेगा... करारा जबाव मिलेगा.... हा डायलॉग आहे. नितेश यांनी हा व्हिडिओ शेअर करत शिवसेनेला थेट इशारा दिला आहे.
— nitesh rane (@NiteshNRane) August 24, 2021
औकात कळली?, निलेश राणेंचा प्रहार
निलेश राणे यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले की, काल संपूर्ण ठाकरे सरकार आणि शिवसेना कामाला लागली होती. पण महाराष्ट्रासाठी नाही तर राणेंसाठी. काल आमचे जे सहकारी व कार्यकर्ते शिवसेनेला भिडले त्यांचे मनापासून आभार. शिवसेनेचे मुख्यमंत्री, मंत्री, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी टोकाचे प्रयत्न करूनसुद्धा आमचं काही उखाडू शकले नाही. औकात कळली?? असा चिमटा निलेश राणे यांनी काढला आहे.
नेमकं काय घडलं होतं ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशाच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल बोलताना केलेल्या विधानाचा संदर्भ देत नारायण राणेंनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान काल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मी त्या ठिकाणी असतो तर उद्धव ठाकरेंच्या कानाखाली मारली असती, असे राणे म्हणाले होते. दरम्यान, रायगडमध्ये नारायण राणेंनी हे चिथावणीखोर विधान केल्यानंतर महाड, नाशिकमध्ये त्यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद झाली होती. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल केलेलं विधान हे संपूर्ण राज्याचा अपमान करणारं आहे, अशी तक्रार नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी दाखल केली होती. त्यानंतर दिवसभर चाललेल्या नाट्यानंतर राणेंना अटक करून महाड येथील कोर्टात दाखल करण्यात आले होते. तेथे रात्री उशिरा त्यांना जामीन मंजुर झाला होता.