नाईक प्रकरण फडणवीस यांनी दाबले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 05:43 AM2021-03-10T05:43:27+5:302021-03-10T05:43:59+5:30

भास्कर जाधव यांचा हल्लाबोल; चौकशी करू : गृहमंत्री देशमुख

The Naik case was suppressed by Fadnavis | नाईक प्रकरण फडणवीस यांनी दाबले

नाईक प्रकरण फडणवीस यांनी दाबले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अलिबागमधील इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने आत्महत्या केली होती. त्या बाबत त्यांच्या पत्नी व मुलीने तक्रार केलेली असतानाही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते प्रकरण दाबून ठेवले, त्याची चौकशी करा अशी मागणी शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव यांनी मंगळवारी विधानसभेत केली. फडणवीस यांनी ते प्रकरण दाबल्याची चौकशी करायची आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी फडणवीस हे सरकारवर विधानसभेत तोफ डागत असतानाच जाधव यांनी त्यांचा हल्ला परतविण्यासाठी अन्वय नाईक प्रकरणात फडणवीस यांच्यावर थेट आरोप केला. या प्रकरणात पत्रकार अर्णब गोस्वामी आरोपी आहे, त्यामुळे ते प्रकरण फडणवीस यांच्याकडून दाबले गेले. या प्रकरणाची चौकशी पोलीस अधिकारी सचिन वाझे करीत असल्यानेच आता वाझेंना मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात गोवले जात आहे. वाझेंना आहे तिथेच ठेवा. अन्वय नाईक प्रकरणात आणखी तपास झाला तर तुम्हाला बेड्या पडतील, फडणवीस अडचणीत येतील, असे जाधव म्हणाले. जस्टिस लोया यांचा नागपुरात मृत्यू कसा झाला हेही फडणवीस यांनी सांगावे, असेही ते म्हणाले.

खुशाल चौकशी करा, आम्ही घाबरत नाही - फडणवीस
तुमच्या धमक्यांना मी घाबरत नाही, करा; तुम्ही माझी चौकशी कराच. कर नाही तर डर कशाला अशा शब्दांत फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आव्हान दिले. माझं खुलं आव्हान आहे, चौकशी करूनच दाखवा असे त्यांनी सुनावले. त्यावर, ‘केंद्रात यांचे सरकार असल्याने त्या बळावर हे अशी आव्हानाची भाषा करीत आहेत’ असे भास्कर जाधव म्हणाले.

Web Title: The Naik case was suppressed by Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.