देशातील आघाडीच्या शाळांमध्ये नाव असलेल्या मुंबईतील एका प्रतिष्ठित शाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्याचं त्याच शाळेतील शिक्षिकेने शारीरिक संबंध ठेवून लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आल्याने शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या शिक्षिकेला अटक करण्यात आली असून, तिच्या चौकशीमधून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. दरम्यान, पीडित विद्यार्थ्यासोबत असलेल्या संबंधांबाबत या शिक्षिकेने चौकशीवेळी आणखी एक धक्कादायक दावा केल्याचं समोर येत आहे. तो विद्यार्थी आणि माझं नातं हे शारीरिक संबंधांच्या पलिकडचं होतं, तसेच आजही त्या विद्यार्थ्याबद्दल माझ्या मनात भावना आहेत, असा दावा या शिक्षिकेने केला आहे.
या शिक्षिकेला पोलिसांनी पॉक्सो कोर्टात हजर केलं असता तिला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जानेवारी २०२४ मध्ये या संपूर्ण प्रकाराला सुरुवात झाली होती. तसेच पुढील वर्षभर या शिक्षिकेकडून सदर विद्यार्थ्याचे शोषण सुरू होते, असे सांगण्यात येत आहे. ही शिक्षिका पीडित अल्पवयीन विद्यार्थ्याला पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जायची. तसेच त्याला दारू पाजायची, त्यानंतर त्याच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायची, अशी माहिती चौकशीमधून समोर आली आहे.
दरम्यान, हा गुन्हा घडला तेव्हा आरोपी शिक्षिकेची मनस्थिती कशी होती हे तपासण्यासाठी तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. त्यात तिची मनस्थिती उत्तम असल्याचं समोर आलं आहे. त्याशिवाय या महिलेच्या पतीचीही चौकशी करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोपी शिक्षिकेला तिच्या एका मैत्रिणीने मदत केल्याचे समोर आले आहे. तसेच हा मुलगा शिक्षिकेपासून दूर राहू लागल्यावर तिनेच या दोघांना पुन्हा जवळ आणल्याचेही उघड झाले आहे.
सदर शिक्षिका ही २०२१ मध्ये या शाळेत दाखल झाली होती. त्यानंतर २०२४ मध्ये तिने पीडित विद्यार्थ्यासोबत पहिल्यांदा संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर एप्रिल महिन्यात तिने नोकरीचा राजीनामा दिला होता. दरम्यान, या महिलेवर अटकेची कारवाई झाल्यानंतरच आपल्याला या संपूर्ण प्रकरणाची माहिती झाल्याचा दावा शाळेच्या प्रशासनाकडून करण्यात आला आहे.