माझी मानसिकता बुराडी कुटुंबासारखी; चेतन सिंहचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 10:02 IST2023-11-25T10:01:45+5:302023-11-25T10:02:20+5:30

आरपीएफ जवान चेतन सिंहचा अजब दावा

My mindset is like the Buradi family; Chetan Singh's strange claim | माझी मानसिकता बुराडी कुटुंबासारखी; चेतन सिंहचा अजब दावा

माझी मानसिकता बुराडी कुटुंबासारखी; चेतन सिंहचा अजब दावा

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माझी मानसिकता अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन सामूहिक आत्महत्या करणाऱ्या दिल्लीतील बुराडी कुटुंबासारखी झाली असल्याचा अजब दावा आरोपी तथा आरपीएफचा हवालदार चेतन सिंह याने केला आहे. चेतन याने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला असून बालपणापासून कधीच कौटुंबिक प्रेम, आपुलकी न मिळाल्यामुळे आपली मानसिक स्थिती बिघडल्याचे म्हटले आहे. न्यायालयाने याप्रकरणी पोलिसांना उत्तर देण्याचे आदेश दिले. 

जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये बेछूट गोळीबार करून तीन प्रवाशांची हत्या केल्याचा आरोपांतर्गत अटकेत असलेल्या रेल्वे पोलिस दलाचा (आरपीएफ) हवालदार चेतन सिंह याची सुटका व्हावी, यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. 

 उत्तर दिल्लीतील बुराडी येथील ११ जणांच्या कुटुंबाने गळफास घेऊन सामूहिक आत्महत्या केली होती. दिल्लीतील २०१८ सालच्या या प्रकरणातील व्यक्तींच्या मानसिकतेशी चेतनने स्वत:ची तुलना केली आहे.
 जामीन अर्जात अशाच मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचा दावा करण्यात आला असून अनेकदा चेतन लहरी वागतो आणि भूताखेतांच्या कथा सांगतो परिणामी, चेतन सध्या ज्या स्थितीत आहे, त्या स्थितीत त्याच्याकडून विवेकी वागण्याची अपेक्षा करता येणार नाही, असा दावा अर्जात करण्यात आला आहे.
 न्यायालयाने चेतन याच्या या अर्जावर पोलिसांना उत्तर दाखल करण्याचे आदेश देऊन प्रकरणाची सुनावणी १ डिसेंबर रोजी ठेवली आहे.

Web Title: My mindset is like the Buradi family; Chetan Singh's strange claim