Join us

‘महापालिकेत २५ वर्षे सत्ता होती; मग काय केले?’; मनसेचा ठाकरे गटाला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 10:55 IST

रस्त्यांवरील खड्डे, टोलविरोधात आदित्य ठाकरेंना आंदोलन करण्याची खुमखुमी आली आहे. महापालिकेत २५ वर्षे सत्ता होती, मग काय केले?

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : रस्त्यांवरील खड्ड्यावरून सुरू झालेल्या राजकारणात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. माजी मंत्री आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी  वेस्टर्न आणि इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वसूल केला जाणारा टोल आणि मुंबईतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण यावरून सरकारला लक्ष्य केले असताना मनसेच्या चित्रपट विभागाचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी तुमची महापालिकेत २५ वर्षे सत्ता होती तेव्हा काय केले? असा सवाल केला आहे. 

ठाकरे यांना लक्ष्य करणारा संदेश खोपकर यांनी समाज माध्यमावर टाकला आहे. याआधी ठाकरे यांना रस्ते व खड्डे यावर बोलण्याचा अधिकार नाही असे प्रत्युत्तर भाजपने दिले होते. रस्त्यांवरील खड्डे आणि टोलविरोधात आदित्य ठाकरेंना आंदोलन करण्याची खुमखुमी आली आहे. महापालिकेत २५ वर्षे सत्ता होती, मग काय केले? असा सवाल खोपकर यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे सध्या टोलसह रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कंत्राटांवरून सत्ताधारी शिवसेना एकनाथ शिंदे गट यांना लक्ष्य करत असून, पावसाळ्यात ही कामे कशी होणार? असा सवाल त्यांनी विचारला होता. तसेच यासाठीच्या निविदा अवाजवी दराने कंत्राटदारांना बहाल करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले होते.

 

टॅग्स :मनसेआदित्य ठाकरेआदित्य ठाकरेउद्धव ठाकरे