शाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी पालिकेची 'सिग्नल शाळा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 14:10 IST2026-03-24T14:10:37+5:302026-03-24T14:10:37+5:30
महापौर रितू तावडे यांच्या हस्ते शाळेचे लोकार्पण

शाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी पालिकेची 'सिग्नल शाळा'
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बेघर, स्थलांतरीत, शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणणाऱ्या सिग्नल शाळेचे लोकार्पण सोमवारी महापौर रितू तावडे यांच्या हस्ते झाले. नव्या शैक्षणिक धोरणांना अंगीकारत सुरू झालेला हा अभिनव प्रयोग विकसित भारत प्रयत्नांमध्ये मोलाचा भाग ठरणारा आहे. येत्या काळात देश-विदेशातील पर्यटक मुंबईत येतील, तेव्हा या सिग्नल शाळेला आवर्जून भेट देतील, असा विश्वास महापौर रितू तावडे यांनी व्यक्त केला.
चेंबूर परिसरात अमर महाल येथे सांताक्रूझ-चेंबूर जोड मार्ग उड्डाणपुलाखाली सिग्नल शाळा सुरू करण्यात आली आहे. मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी सिग्नल शाळा ही संकल्पना ठाणे आणि नेरूळ मध्ये समर्थ भारत व्यासपीठ संस्थेने राबवली आहे. आता मुंबईत चेंबूर येथे हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महापौरांच्या हस्ते नामफलक अनावरण तसेच, प्राथमिक वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.
त्यानंतर व्यवसाय प्रशिक्षण, लघु उद्योग प्रशिक्षण, पाककला प्रशिक्षण, रोबोटिक लॅब, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा या सर्वांची मान्यवरांनी पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकही उपस्थित होते.
उपक्रमासाठी पालिका करणार आर्थिक तरतूद
मुंबई महानगरात उड्डाणपुलांखाली, तसेच वाहतूक बेटांच्या शेजारी राहणारी अशी मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने ठोस प्रयत्न केले जातील. त्यासाठी मुंबईतील पूल परिसरांचे सर्वेक्षण केले जाईल, महापालिकेच्या वतीने उपक्रमासाठी आवश्यक ती तरतूद केली जाईल असे महापौर तावडे यांनी सांगितले.
मुंबईतील पहिली सिग्नल शाळा आता सुरू झाली आहे. शिक्षणासोबतच आहार, तंत्रज्ञान शिक्षण, मानसिक स्थैर्य या शाळेत मुलांना मिळेल. या शाळेतील मुले साक्षर होऊन पुढे पालिकेच्या शाळांमध्ये, मुख्य शैक्षणिक प्रवाहात येतील, यावरही भर दिला आहे. - डॉ. प्राची जांभेकर, उपआयुक्त (शिक्षण)
शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समर्थ भारत व्यासपीठ संस्थेने सिग्नल शाळेद्वारे प्रयत्न केले. ज्यामुळे अनेक मुले शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आली. काही उच्च शिक्षण घेऊन रोजगारक्षम झाली. ठाण्याच्या धर्तीवर मुंबईत देखील सिग्नल शाळा उभी रहावी, यासाठी जिल्हा नियोजन निधीतून अर्थसहाय्य उपलब्ध झाले. त्यामुळे ही शाळा उभी राहू शकली. - भटू सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी, समर्थ भारत व्यासपीठ