पालिकेचे दवाखाने आता सायंकाळीही सुरू राहाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:32 IST2021-02-05T04:32:50+5:302021-02-05T04:32:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या महामारीमुळे आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले, त्यानंतर पालिका व राज्य शासनाच्या यंत्रणेला ...

पालिकेचे दवाखाने आता सायंकाळीही सुरू राहाणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या महामारीमुळे आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले, त्यानंतर पालिका व राज्य शासनाच्या यंत्रणेला आरोग्यव्यवस्था उभारण्यासाठी कंबर कसावी लागली. परिणामी, यातून आता धडा घेऊन लवकरच आरोग्यव्यवस्थेचे बळकटीकरण करण्यात येणार असून, विभागावर आजारांची माहिती, त्यानुसार व्यवस्थापन करण्यात येणार आहे. शिवाय, लवकरच पालिकेचे दवाखानेही आता सायंकाळीही सुरू राहणार आहे.
शहर उपनगरात प्रायोगिक तत्त्वावर १५ दवाखाने सायंकाळी कार्यरत आहेत. या दवाखान्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने भविष्यात सर्व दवाखाने सायंकाळी सुरू करण्याचा निर्णय लवकरच अंमलात आणण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
मुंबई महापालिकेच्या आरोग्यव्यवस्थेत मुळापासून बदल करण्यात येणार आहे. येत्या काळात विभागातील आजारानुसार तेथील वैद्यकीय यंत्रणा तयार केली जाणार आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत महापालिकेला मुंबईतील प्रत्येक घरातील सदस्यांची आरोग्यविषयक माहिती उपलब्ध झाली आहे. त्यानुसार भविष्यात प्रभागांमधील आरोग्यव्यवस्था राबविण्याचा विचार महानगरपालिकेचा आहे. सध्या ही माहिती संग्रहीत केली जात असून, त्याचे योग्य नियोजन करण्यात येणार आहे. मुंबईत ३० लाखांहून अधिक नागरिक ५० वर्षांवरील आहे. एखाद्या प्रभागात मधुमेहाचे अधिक रुग्ण असतील, त्याप्रमाणे प्रभागात आवश्यक वैद्यकीय यंत्रणा उभारली जाईल. एखाद्या विभागात श्वसनाच्या आजाराचे रुग्ण जास्त असतील तर त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबर ६० हजार नागरिकांसाठी एक आरोग्य केंद्र अशी रचना केली जाणार आहे. त्यातून सर्वेक्षण करून आरोग्याबाबत माहिती घेतली जाईल, अशी माहिती काकाणी यांनी दिली.