भाजपविरोधात १०१, तर शिंदेसेनेच्या विरोधात ८३ ठिकाणी मनसे लढणार; मराठी मते कोणाला मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 05:51 IST2026-01-05T05:50:14+5:302026-01-05T05:51:52+5:30
महामुंबईत मनसेचा भाजपला फटका बसणार की होणार लाभ, वसई-विरारचा अपवादवगळता अन्य बहुतेक महापालिकांत ठाकरे बंधूंची युती.

भाजपविरोधात १०१, तर शिंदेसेनेच्या विरोधात ८३ ठिकाणी मनसे लढणार; मराठी मते कोणाला मिळणार?
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई / ठाणे: महामुंबईतील वेगवेगळ्या पालिकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात १०१ ठिकाणी, तर शिंदेसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात ८३ ठिकाणी लढत आहे.
वसई - विरार पालिकेचा अपवादवगळता अन्य बहुतेक महापालिकांत ठाकरे बंधूंची युती आहे. त्यामुळे मनसे ही भाजपला अप्रत्यक्ष मदत करण्याकरिता भाजपच्या सांगण्यावरून उद्धवसेनेसोबत गेली आहे, हा भाजप नेत्यांचा दावा ही लोणकढी थाप आहे की, भाजपचे उमेदवार विजयी व्हावेत, याकरिता मनसेने भाजपसमोरील सर्वाधिक जागा पदरात पाडून घेतल्या आहेत, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
मुंबई : भाजप - उद्धवसेना ९३ जागांवर आमने-सामने
मनसे शिंदेसेना यांच्यात १७ जागांवर, तर मनसे - भाजप लढत ३३ जागांवर आहे. शिंदेसेना विरूद्ध उद्धवसेना ६४ ठिकाणी आमने-सामने असून, भाजप विरूद्ध उद्धवसेना ९३ ठिकाणी लढत आहे. मुंबईत भाजपनेच उद्धवसेनेला अंगावर घेतले आहे.
ठाणे : शिंदेसेनेला मनसेचे आठ जागांवर आव्हान
शिंदेसेना विरूद्ध मनसे आठ जागांवर आमने-सामने असून, भाजप विरूद्ध मनसे सात जागांवर लढत आहे. तसेच शिंदेसेना विरूद्ध उद्धवसेना ४९ जागांवर, तर भाजप विरूद्ध उद्धवसेना १३ जागांवर सामना होत आहे. शिंदेसेना विरूद्ध तुतारी ११ जागांवर, तर भाजप विरूद्ध राष्ट्रवादी (अजित पवार) जागांवर सामना आहे. भाजप विरूद्ध तुतारी हा सामनाही एका जागेवर आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) विरूद्ध राष्ट्रवादी (अजित पवार) हा सामना ३२ ठिकाणी आहे.
नवी मुंबई : भाजप विरूद्ध २५ ठिकाणी लढत
मनसेचे २५ उमेदवार रिंगणात असून, २५पैकी २५ ठिकाणी भाजप विरोधात लढत आहेत तर २५ पैकी २३ ठिकाणी शिंदेसेनेच्या विरोधात लढत आहेत. मनसे २५, उद्धवसेना ५६ जागांवर लढत असून, ठाकरेबंधूंची युती आहे.
वसई / विरार : ठाकरे बंधूंची युती नाही; दोघांना संधी
बहुजन विकास आघाडी व मनसे यांची युती आहे. मनसेला वसईची वालीव आणि नालासोपारा पूर्वेकडील जागा सोडण्यात आली आहे. दोन्ही उमेदवार रेल्वे इंजिनऐवजी बविआच्या शिट्टी निशाणीवर लढत आहेत.
कल्याण - डोंबिवली : शिंदेसेनेला १७, तर भाजपला १४ जागांवर आव्हान
शिंदेसेना विरूद्ध मनसे १७ ठिकाणी, तर भाजप विरूद्ध मनसे १४ ठिकाणी सामना आहे.
उल्हासनगर : मनसेहाती मशाल आणि इंजिनही
मनसे सात जागी रेल्वे इंजिनवर, तर पाच ठिकाणी उद्धवसेनेच्या मशाल चिन्हावर लढत आहे. भाजप व शिंदेसेना हे परस्परविरोधात लढत असल्याने त्यांच्या विरोधात पाच ठिकाणी मनसे लढत आहे.
मीरा-भाईंदर : ११ जागांवर संघर्ष
११ जागांवर मनसेची भाजपा - शिंदेसेनेसोबत लढत आहे. त्या सर्व जागा भाजपा - शिंदेसेनेसोबत त्यांची लढत आहे. या महापालिकेत भाजप-शिंदेसेना युती नाही.
पनवेल : दोन ठिकाणी भाजपशी लढत
भाजप विरूद्ध मनसे लढत दोन ठिकाणी आहे. प्रभाग क्र. १० आणि १७ मध्ये ही लढत होत आहे. त्यामुळे लक्षवेधी लढती आहेत. शिंदेसेना विरूद्ध मनसे अशी लढत कुठेच नाही.
भिवंडी : भाजप विरूद्ध मनसेेनेत होणार झुंज
प्रभाग क्र. २० अ आणि प्रभाग क्र. २३ ड या दोन प्रभागांतून भाजप उमेदवारांच्या विरोधात मनसेचे उमेदवार रिंगणात आहेत. शिंदेसेनेच्या विरोधात मनसेचा एकही उमेदवार नाही.