महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
By यदू जोशी | Updated: December 27, 2025 06:20 IST2025-12-27T06:20:06+5:302025-12-27T06:20:36+5:30
भाजप-शिंदेसेनेविरुद्ध जाताना शरद पवार यांच्याशी मात्र जवळीक रणनीती काय? : धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी भाजप-शिंदेसेनेसाठी ठरणार लाभदायक

महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
- यदु जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात भाजप व शिंदेसेनेसोबत सत्तेत असलेल्या आणि मोदी सरकारला पाठिंबा दिलेल्या राष्ट्रवादीने (अजित पवार) महापालिका निवडणुकीत बहुतेक ठिकाणी वेगळी चूल मांडली आहे. सत्तेत सोबत असताना मित्रपक्षांच्या विरोधात जात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी युती करण्याची नवीन भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा थेट सामना हा दोन राष्ट्रवादींच्या युतीशी असेल. सत्ता मिळविण्यासाठी भाजप-शिंदेसेनेला मित्रपक्षाशी लढावे लागेल. भाजप-शिंदेसेनेच्या विरोधात जाणाऱ्या धर्मनिरपेक्ष मतांची उद्धवसेना, काँग्रेस, अजित पवार-शरद पवार यांचा पक्ष आणि अन्य पक्षांमध्ये विभागणी होईल, त्याचा फायदा भाजप-शिंदेसेनेला होऊ शकेल. युतीच्या चर्चेपासून भाजपने अनेक ठिकाणी अजित पवारांच्या स्थानिक नेत्यांना दूर ठेवले आहे. शिंदेसेनेलाही तिसरा भागीदार नको आहे.
कोणत्या विभागात काय स्थिती? भाजप-शिंदेसेना एकत्र, अजित पवार मात्र दूरच
पश्चिम महाराष्ट्र : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत अजित पवार-शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने एकत्रित लढण्याचे ठरवत चर्चा बरीच पुढे नेली आहे. इचलकरंजी महापालिकेत भाजप-शिंदेसेनेत ९० टक्के जागांवर एकमत झाले आहे. चर्चेच्या पहिल्या टप्प्यात एक तृतीयांश जागा मागणाऱ्या अजित पवारांच्या पक्षाला भाजप-शिंदेसेनेने प्रतिसाद देणे बंद केले आहे. कारण त्यांची केवळ तीन जागा देण्याची तयारी आहे. फक्त कोल्हापुरात मात्र महायुतीतील तीन पक्षांची युती होईल, असे चित्र आहे.
उत्तर महाराष्ट्र : नाशिकमध्ये अजित पवारांच्या पक्षाला भाजपने फारसे मोजलेले नाही. शिंदेसेनेशी युती होणार असे स्पष्ट चित्र आहे. जळगावमध्ये अजित पवारांच्या पक्षाने भाजपकडे २६ जागा मागितल्या आहेत. ‘विचार करतो आणि कळवतो’, एवढेच भाजपने त्यांना कळविले आहे. धुळ्यात स्वतंत्र लढण्याची अजित पवारांच्या पक्षाची तयारी आहे पण युती होत असेल तर दोन पाऊल मागे जाऊ असे पक्षाचे प्रभारी आ.अनिल पाटील सांगत आहेत, पण तिथे भाजप-शिंदेसेनेची युती होईल, असे चित्र आहे.
मराठवाडा : छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीने (अजित पवार गट) महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तिथे अजित पवारांचा पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. नांदेड, लातूर आणि जालनामध्येही हेच चित्र आहे. परभणीत तिन्ही पक्ष महायुतीत असतील अशी शक्यता आहे.
विदर्भ : अमरावतीत अजित पवार गटाचे स्थानिक आमदार दाम्पत्य संजय खोडके-सुलभा खोडके यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. चंद्रपुरात राष्ट्रवादीने (अजित पवार गट) भाजपविरोधात लढण्याचे ठरविले आहे. नागपुरात अजित पवारांच्या पक्षाची २२ जागांची मागणी भाजपने अमान्य केली. स्वबळावर लढू असे स्थानिक पदाधिकारी सांगत आहेत. अकोल्यात अजित पवारांच्या पक्षात दोन गट आहेत. एक गट भाजपशी चर्चा करू पाहत आहे, पण भाजपचा प्रतिसाद नाही.
मुंबई/कोकण : मुंबईत अजित पवार गट वेगळा लढणार असे चित्र आहे. नवी मुंबईत अजित पवार गटाचे नेते सांगतात की आम्ही भाजपच्या संपर्कात आहोत पण भाजपकडून हालचाली नाहीत. ठाण्यात राष्ट्रवादीला (शरद पवार गट) सोबत घेण्याचा राष्ट्रवादीचा (अजित पवार गट) प्रयत्न आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप-शिंदेसेनेसोबत युती करायची की नाही या बाबत पक्षनेतृत्वाकडून अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांना अद्यापही काहीही निरोप नाही.