मुंब्रा अपघात: पोलिस, रेल्वे प्रशासन आमने-सामने; रेल्वे म्हणते- दाखल केलेला गुन्हा चुकीचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 14:01 IST2025-11-05T14:01:06+5:302025-11-05T14:01:53+5:30
मुंब्रा अपघातावर रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांतच जुंपल्याचे समोर आले आहे

मुंब्रा अपघात: पोलिस, रेल्वे प्रशासन आमने-सामने; रेल्वे म्हणते- दाखल केलेला गुन्हा चुकीचा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंब्रा अपघातामध्येरेल्वे पोलिसांनी (जीआरपी) रेल्वेच्या अभियंत्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा नोंदवला. मात्र, रेल्वे प्रशासनाने जीआरपीच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रुळांसंबंधित कुठल्याही प्रकारचे ज्ञान नसताना त्यांच्या माध्यमातून तपास करण्यात आल्याचा दावा करत रेल्वे अधिकाऱ्यांनी अहवालाबाबत शंका उपस्थित केली आहे. तसेच जीआरपीने नोंदवलेल्या गुन्ह्याबद्दल राज्याच्या गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांची भेट घेतली आहे. यामुळे मुंब्रा अपघातावर रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांतच जुंपल्याचे समोर आले आहे.
जीआरपीने रेल्वेचे वरिष्ठ अभियंता समर यादव आणि सहायक अभियंता विशाल डोळस यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी मात्र, रेल्वे पोलिसांचे तर्क खोडून काढले आहेत.
'त्या' बॅगमुळेच अपघात; मध्य रेल्वे भूमिकेवर ठाम
मुंब्रा येथील दुर्दैवी घटनेला कारणीभूत प्रवाशांची बाहेर असलेली बॅगच कारणीभूत असल्याच्या कारणावर मध्य रेल्वे ठाम आहे. मुंब्रा येथील घटनेत आठ प्रवासी चालत्या ट्रेनमधून पडले तेव्हा दोन्ही लोकलच्या दरवाजात लटकलेल्या प्रवाशांमध्ये फक्त ०.७५ मीटरचे अंतर असल्याचे संभाव्य कारण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान रेल्वे अधिकाऱ्यांनी गृह विभागाचे अपर मुख्य सचिवांची भेट घेऊन अभियंत्यांच्या अटकपूर्व जामिनाबाबत चर्चा करण्यात आल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.
जीआरपीचा दावा काय?
जीआरपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, मुंब्रा स्टेशनजवळील खाडी पूल आणि स्टेशन परिसर खचला होता. तर अपघात झालेल्या ठिकाणी रुळांना तडे गेले होते. ज्याची वेल्डिंग रेल्वेने निष्काळजीपणे केली होती. असमतोल रुळांमुळे लोकलचा तोल जाऊन प्रवासी खाली पडल्याचे म्हटले आहे. मात्र, रेल्वेने या आरोपात तथ्य नसल्याचे म्हटले आहे. तसेच, रेल्वे यंत्रणा इतकी सक्षम आहे की, वाहतुकीदरम्यान रुळांमध्ये काही त्रुटी आढळल्यास मोटरमन किंवा ट्रेन मॅनेजर तत्काळ कळवतात. रुळांना तडे गेले असते किंवा जमीन खचली असती, तर ट्रेन रुळांवरून घसरली असती, असा युक्तिवाद रेल्वे अधिकाऱ्यांनी केला. व्हीजेटीआयचा अहवाल अपघातानंतर तब्बल महिनाभराने झाल्याने तो विश्वासार्ह नसल्याचे त्यांनी नमूद केले.