मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

By सीमा महांगडे | Updated: August 22, 2025 08:07 IST2025-08-22T06:18:20+5:302025-08-22T08:07:35+5:30

मरिन ड्राइव्ह, विद्याविहार, मढ भागात सर्वात शुद्ध पाणी

Mumbai's most polluted water is in Bhendi Bazaar, Bandra East, Colaba, Cuffe Parade, Santa Cruz! | मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

सीमा महांगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईच्या बी वॉर्ड परिसरातील भेंडी बाजार, मस्जिद बंदर, एच पूर्व मधील वांद्रे, सांताक्रूझ तसेच ए वॉर्डातील कुलाबा, कफ परेड या भागात सर्वाधिक दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे धक्कादायक वास्तव महापालिकेच्या वार्षिक पर्यावरण अहवालातून समोर आले आहे. सी वॉर्डातील मरिन ड्राइव्ह, काळबादेवी, एन वॉर्डातील विद्याविहार, विक्रोळी पार्क साईट, पी उत्तर विभागातील मालवणी, मढ मालाड भागातील दूषित पाण्याची टक्केवारी मात्र शून्य आहे.

मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असून, पाणीपुरवठ्याच्या जलवाहिन्यांच्या मोठ्या जाळ्याद्वारे तो केला जातो. त्या जाळ्याची वेळोवेळी साफसफाई न केल्यास पाण्याचा पुरवठा दूषित होण्याची शक्यता असते. तसेच पावसाळ्यात पुराचे पाणी साचल्याने वितरण प्रणालीतील जुन्या आणि नवीन बांधकामामुळे, झोपडपट्टयांमधील बेकायदेशीर नळ जोडणी, नळ गळती, खराब पाईप आणि योग्य देखभाल न केल्याने पाणी दूषित होऊ शकते. मुंबईकरांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे, यासाठी भांडुप येथे पाण्यावर ट्रीटमेंट केली जाते. तसेच पुढे वितरित करण्यात येणाऱ्या पाण्याचीही गुणवत्ता तपासली जाते. यामुळे अधिकाऱ्यांना पाण्याच्या गुणवत्तेची आणि त्याच्या संभाव्य धोक्यांची माहिती होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दूषित पाणी म्हणजे काय?

पालिकेकडून रोज जवळपास १५०-१८० नमुने तर पावसाळ्यात किंवा आपत्कालीन काळात जवळपास २००-२५० पाण्याचे नमुने जलाशय तसेच जलवितरण प्रणालीमधून गोळा करून तपासले जातात. मानकानुसार, पाणीपुरवठ्यातील पाण्याचे हे नमुने पिण्याचे पाणी कोलिफोर्म आणि ई-कोलाय या जीवाणूपासून मुक्त असले पाहिजेत. तसे ते नसेल तर दूषित समजले जाते.

दुषित पाण्यामुळे अतिसाराचा त्रास होतो. पोटाचा संसर्ग होऊ शकतो. गॅस्ट्रो, काविळ, ई-कोलाय हे आजारही होतात. त्यामुळे पाणी उकळून आणि गाळून प्यावे.
-डॉ. मधुकर गायकवाड, सहयोगी प्राध्यापक, जे. जे. रुग्णालय

चेक करा, तुमच्या भागातील पाणी किती टक्के दूषित ?

  • ०.४६% मुंबईचे पाणी दूषित
  • भायखळा, माझगाव, चिंचपोकळी, नायगाव, परळ, चेंबूर, टिळक नगर, गोरेगाव, राम मंदिर, चिंचोली बंदर - ०.१
  • कांदिवली, पोयसर, चारकोप, चार बंगलो, गिल्बर्ट हिल, वर्सोवा, विलेपार्ले पूर्व, जेबी नगर, माटुंगा पश्चिम, दादर पश्चिम, सायन कोळीवाडा, अँटॉप हिल - ०.२
  • मलबार हिल, गिरगाव, ग्रँट रोड - ०.४
  • सांताक्रूझ पश्चिम, खार, मानखुर्द, गोवंडी, बोरिवली, कुलुपवाडी, वजिरा नाका - ०.५
  • मुलुंड, नाहूर - १.०
  • कफ परेड, कुलाबा - १.५
  • वांद्रे पूर्व, टीचर्स कॉलनी - १.६
  • भेंडी बाजार, मस्जिद बंदर - ३.२

Web Title: Mumbai's most polluted water is in Bhendi Bazaar, Bandra East, Colaba, Cuffe Parade, Santa Cruz!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.