मुंबईच्या जीवनवाहिनीची देखभाल १०० महिलांच्या हाती; महिला कर्मचाऱ्यांच्या संख्येत १० टक्के वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 11:29 IST2025-10-03T11:28:24+5:302025-10-03T11:29:20+5:30
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल यार्डमध्ये तब्बल १०० महिला मेंटेनन्स स्टाफ असून त्या मुबंईकरांच्या जीवनवाहिनीची देखभाल करत आहेत.

मुंबईच्या जीवनवाहिनीची देखभाल १०० महिलांच्या हाती; महिला कर्मचाऱ्यांच्या संख्येत १० टक्के वाढ
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल यार्डमध्ये तब्बल १०० महिला मेंटेनन्स स्टाफ असून त्या मुबंईकरांच्या जीवनवाहिनीची देखभाल करत आहेत. त्यांच्यामार्फत रोज धावणाऱ्या लोकलची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. गेल्या १० वर्षांमध्ये त्यांची संख्या एकूण कर्मचाऱ्यांच्या १० टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सुरक्षित प्रवासासाठी मुंबई लोकलच्या देखभालीचे काम कारशेडमध्ये केले जाते. काही वर्षांपूर्वीपर्यंत हे काम केवळ पुरुष करत असत; परंतु आता महिलांनीही तांत्रिक कामांमध्ये हातभार लावण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम रेल्वेच्या सर्व कारशेडपैकी, मुंबई सेंट्रल कार शेडमध्ये सर्वाधिक महिला कार्यरत आहेत. या महिला ईएमयू रेकची देखभाल करण्यापासून ते हाय-व्होल्टेज ट्रॅक्शन सिस्टिमची देखभाल करण्यापर्यंत सर्व काही हाताळतात. महिलांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, सुरुवातीला त्यांना नेमके काय आणि कसे करायचे हे समजले नव्हते. लोकलची देखभाल-दुरुस्ती हे काम अत्यंत कष्टाचे होते. मात्र, कालांतराने त्यातून बरेच काही शिकायला मिळाले, असे महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले. २०१५ मध्ये केवळ मोजक्या महिला होत्या. आता त्यांची संख्या १०० झाली असून त्यांची संख्या आणखी वाढ करण्याचा प्रयत्न असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
उत्तम प्रकारे पार पाडतात प्रत्येक जबाबदारी
देखभाल पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, पश्चिम रेल्वेकडे ११२ रेक आहेत. सर्व रेकची वेळोवेळी देखभाल केली जाते. ही देखभाल दररोज, दर दोन महिन्यांनी आणि दर सहा महिन्यांनी केली जाते. प्रत्येक देखभाल कालावधीत वेगवेगळ्या तपासण्या करण्यात ये आहेत. सर्व कारशेडमध्ये महिलांची नियुक्ती आमच्यासाठी खूप मौल्यवान ठरली आहे, कारण त्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडल्याचे अविनीत अभिषेक यांनी सांगितले.