मुंबईची हवा वाईटच! वायुप्रदूषणाचे काय परिणाम? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 15:13 IST2023-05-17T15:12:47+5:302023-05-17T15:13:05+5:30
२०१३ ते २०२२ दरम्यान वायू प्रदूषणाच्या तक्रारींमध्ये २३७ टक्क्यांची वाढ झाली आहे.

मुंबईची हवा वाईटच! वायुप्रदूषणाचे काय परिणाम? जाणून घ्या
मुंबई : रस्त्यांची कामे, नवीन बांधकाम प्रकल्पांची कामे, वातावरणातील बदल या सगळ्यांचा परिणाम मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवर (एयर क्वालिटी इंडेक्स) सातत्याने होत आहे. २०२२ या वर्षात एकूण दिवसांपैकी सरासरी केवळ १३ टक्के दिवस म्हणजे जवळपास ४७ दिवस हे मुंबईकरांसाठी हवेच्या चांगल्या गुणवत्तेचे ठरले तर २२ टक्के म्हणजेच ७९ दिवस हे हवेच्या समाधानकारक गुणवत्तेचे ठरले होते. ९ टक्के म्हणजेच वर्षभरातील जवळपास हवेची गुणवत्ता ही मुंबईकरांसाठी वाईट ठरली तर ८ दिवस तर अतिशय वाईट हवा गुणवत्तेचे असल्याचे समोर आले आहे. २०१३ ते २०२२ दरम्यान वायू प्रदूषणाच्या तक्रारींमध्ये २३७ टक्क्यांची वाढ झाली आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२२ मध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक ६१ इतका होता तर सगळ्यात वाईट २१० इतका तो डिसेंबर २०२२ मध्ये असल्याची माहिती प्रजा फाउंडेशनच्या अहवालात देण्यात आली आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक पावसाळ्यात कमी तर हिवाळ्यात वाढल्याचे निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे.
वायुप्रदूषणाचे काय परिणाम?
वृद्ध आणि मुले यांना विशेषत: वायू प्रदूषणाचा जास्त परिणाम होतो. शिवाय, सह-व्याधी, हृदयरोग, कर्करोगाचे रुग्ण, कोविड रूग्ण आणि सीओपीडी रुग्णांना जास्त धोका असतो. गंभीर लोकांव्यतिरिक्त, निरोगी लोकांना डोळ्यांमध्ये खाज सुटणे, कोरड्या हवामानामुळे त्वचेवर परिणाम होणे अशा तक्रारी उद्भवतात. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दम्याने त्रस्त असलेल्या रुग्णांनी प्रदूषण वाढल्यानंतर काळजी घेणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांत वाढलेल्या वाहनांच्या धुरामुळे धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या दृष्टीने चिंताजनक आहे..