Mumbaikars robbed of Rs 60 crore in the lure of triple return | तिप्पट परताव्याच्या आमिषाने  मुंबईकरांना 60 कोटींचा गंडा, नाशिकच्या जोडगोळीकडून हजारो जणांची फसवणूक

तिप्पट परताव्याच्या आमिषाने  मुंबईकरांना 60 कोटींचा गंडा, नाशिकच्या जोडगोळीकडून हजारो जणांची फसवणूक

मुंबई : आकर्षक व्याज व दुप्पट, तिप्पट परतावा देण्याच्या आमिषाने नाशिकमधील एका जोडगोळीने मुंबईकरांना तब्बल ६० कोटींचा गंडा घातल्याची बाब समोर आली आहे. विष्णू रामचंद्र भागवत व प्रफुल्ल विनायक नेस्ताने अशी त्यांची नावे असून, विविध कंपन्या, क्रेडिट सोसायटीच्याद्वारे गेल्या ५ वर्षात विविध प्रलोभने दाखवित ही फसवणूक केली आहे.

मुंबई व परिसरातील हजारो नागरिक त्यांच्या जाळ्यात अडकले आहेत. कंपनीची मुलुंड, बोरिवलीतील कार्यालये गेल्या वर्षभरापासून बंद आहेत. सर्व पीडित गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन त्याविरुद्ध आदर्श इन्व्हेस्टर्स ॲण्ड डिपाॅझिटर्स वेलफेअर फोरम स्थापन केला आहे. ठगांविरुद्ध त्यांनी मुंबईत आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र, सहा महिने होऊनही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने गुंतवणूकदार हतबल झाले आहेत.

भागवत व निस्ताने यांनी मुंबईसह राज्यभरातील नागरिकांची अशाच पध्दतीने फसवणूक केली असून, गेल्यावर्षी नाशिकमध्ये गुन्हा दाखल आहे. सध्या भागवत जेलमध्ये, 
तर नेस्ताने जामीनावर बाहेर असल्याचे फोरमकडून सांगण्यात आले.

१४ कंपन्यांच्या माध्यमातून केली सभासद नोंदणी
विष्णू भागवत व प्रफुल्ल नेस्ताने यांनी गुंतवणूकदारांना आमिषे दाखविण्यासाठी ५ वर्षांत १४ कंपन्या बनवून मुंबईसह राज्यभरातील नागरिकांना कोट्यवधीचा गंडा घातला आहे. या दोघांनी ऑगस्ट २०१५मध्ये उज्वलम ॲग्रो मल्टी स्टेट को. ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या कंपनीची सुरुवात करून विविध प्रकारच्या ठेव योजनांच्या जाहिराती व साखळी पध्दतीने सभासद नोंदणी केली. सुरुवातीची दोन वर्षे परतावा देत राहिले. त्यादरम्यान माऊली मल्टीस्टेट क्रेडिट को. ऑपरेटिव्ह सोसायटी, संकल्पसिद्धी प्रॉडक्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, फ्लाय हॉलिडे प्रायव्हेट लिमिटेड, स्काय फिलर्स, प्रॉफीट टीचर, इन्फिनिटी टुरिझम अशा वेगवेगळ्या नावांच्या १४ कंपन्या बनवून गुंतवणूकदारांकडून सुमारे साठ कोटीच्या ठेवी जमविल्या. मात्र, त्यानंतर कार्यालये बंद केली. त्यानंतर दोन वर्षांपासून एकाही गुंतवणूकदाराला परतावा न देता पसार झाले.

आकर्षक परताव्याच्या आमिषाने त्यांच्या विविध कंपन्यांमध्ये अनेकांनी ५० हजारांपासून १ कोटीपर्यंतची गुंतवणूक केली आहे. आतापर्यंत फोरमकडे १२ हजारांपेक्षा अधिक पीडितांची नोंद झाली असून, ही संख्या दीड लाखावर आहे. आम्ही पोलीस व न्यायालयात हक्कासाठी लढा देत आहोत.
- अनंत गोरे (सरचिटणीस, 
आदर्श इन्व्हेस्टर व डिपॉझिट वेलफेअर फोरम, मुंबई)

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mumbaikars robbed of Rs 60 crore in the lure of triple return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.