मुंबईकरांची सकाळ ऊबदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 15:32 IST2020-12-09T15:31:46+5:302020-12-09T15:32:12+5:30
Warm morning : किमान तापमान २० अंश

मुंबईकरांची सकाळ ऊबदार
मुंबईकरांची सकाळ ढगाळ हवामानाने
मुंबई : मुंबईचे किमान तापमान १९ अंशावरून १७ अंशावर घसरले असतानाच बुधवारी मात्र मुंबईच्या हवामानात अचानक बदल झाले. मुंबईकरांची पहाट ढगाळ हवामानाने उजाडली असतानाच किमान तापमान १८ ते २० अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले. तर राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमान सर्वसामान्य नोंदविण्यात आले, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून देण्यात आली. विशेषत: गेल्या काही दिवसांच्या तुलनेत बुधवारची सकाळ किंचित ऊबदार म्हणून नोंदविण्यात आल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.
उत्तर भारत गारठत असला तरी मुंबईसह महाराष्ट्रात अद्याप म्हणावी तशी थंडी पडलेली नाही. एव्हाना राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान ६ अंशापर्यंत खाली उतरलेले असते. मात्र अद्याप नाशिक, पुणे, महाबळेश्वर आणि माथेरान ही शहरे म्हणावी तशी गारठलेली नाहीत. राज्यातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान १० अंशावरच नोंदविण्यात येत आहे. मुंबईचा विचार करता मुंबईत आतापर्यंत या हंगामात किमान तापमान १७ अंशापर्यंत खाली उतरले आहे. आणि डिसेंबर महिन्यात हे किमान तापमान १५ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
------------
किमान शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये...
बीड १५.१
सातारा १७
उस्मानाबाद १५.७
बारामती १६.१
मालेगाव १४.६
रत्नागिरी २३
कोल्हापूर २०.५
पुणे १४.५
नाशिक १३.२
परभणी १२.६
मुंबई २०.८
नांदेड १४.८
जालना १४.८