येत्या दोन-चार वर्षांत मुंबईचे रुपडे पालटणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 06:14 PM2021-01-29T18:14:20+5:302021-01-29T18:16:16+5:30

Chief Minister Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की,  मेट्रो २ - अ आणि ७ मुळे मुंबईचा वेग वाढणार आहे. लोककला पर्याय मिळाल्याने त्यावर येणारा ताण कमी होईल. शिवाय प्रवाशांना देखील पर्यायी वाहतूक उपलब्ध होईल.

Mumbai will change in the next two to four years - Chief Minister Uddhav Thackeray | येत्या दोन-चार वर्षांत मुंबईचे रुपडे पालटणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

येत्या दोन-चार वर्षांत मुंबईचे रुपडे पालटणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

googlenewsNext

मुंबई :  प्रत्येक दिवस विशेष असतो. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. कारण नवी मेट्रोमुंबईत दाखल झाली आहे. मेट्रो ही मुंबईचे आकर्षण आहे. मुंबई वाढते आहे. पसरते आहे. वाढत्या मुंबईला सामावून घेण्यासाठी आम्ही काम करत असून येत्या दोन चार वर्षांत मुंबई बदलणार आहे. मुंबई आखीव रेखीव होईल. मुंबईचे रुपडे पालटणार आहे. कारण बेस्ट बसची संख्या दहा हजार होईल. मे महिन्यात मेट्रो सुरू होईल. कोस्टल रोडचे काम सुरू आहे. ही कामे पूर्ण करतानाच मागच्या सरकारने ज्या वेगाने काम केले त्या पेक्षा अधिक वेगाने काम करत नागरिकांच्या सेवेस उतरू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

बंगळुरू येथून मुंबईत २७ जानेवारी रोजी रात्री दाखल झालेल्या मेट्रो ट्रेनचा अनावरण समारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २९ जानेवारी रोजी सायंकाळी चारकोप डेपोमध्ये करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ब्रँडिंग मॅन्युअल, ट्रॅव्हल कार्ड, ऑपरेशनल कंट्रोल सेंट्रल, ग्रहण उप केंद्र, चारकोप आगार आणि रिसिव्हिंग सबस्टेशनचे उद्घाटन देखील याप्रसंगी करण्यात आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की,  मेट्रो २ - अ आणि ७ मुळे मुंबईचा वेग वाढणार आहे. लोककला पर्याय मिळाल्याने त्यावर येणारा ताण कमी होईल. शिवाय प्रवाशांना देखील पर्यायी वाहतूक उपलब्ध होईल. आज रेल्वेला खूप गर्दी असते. आता मेट्रो प्रकल्पाला सुरुवात झाली की रेल्वेची गर्दी कमी होईल. त्यावर ताण येणार नाही. आपली मेट्रो चालक विरहित असणार आहे. मुंबईत जेवढी मेट्रोची कामे सुरू आहेत तेवढी कामे जगाच्या पाठीवर कुठेही सुरू नाहीत. मागच्या सरकारने ज्या वेगाने ही कामे केली त्या पेक्षा अधिक वेगाने आम्ही ही कामे करू.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव म्हणाले की, आजचा दिवस मुंबईसाठी ऐतिहासिक आहे. कारण नवी मेट्रो मुंबईत दाखल झाली आहे. २००९ मध्ये मुंबईत पहिली मेट्रो आली. २०१४ मध्ये त्याचे अनावरण झाले. त्यानंतर आज मुंबईत स्वदेशी मेट्रो दाखल झाली आहे. कोरोनामुळे मेट्रो येण्यास सहा महिन्यांचा विलंब झाला. आजचा दिवस अभिमानाचा आहे. मेट्रो धावू लागल्या नंतर लोकांना दिलासा मिळणार आहे; कारण लोकल प्रवासास पर्याय मिळणार आहे. आज एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. २०२६ पर्यंत सगळे मेट्रो प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे मुंबई इन मिनिट्स हे स्वप्न साकार होणार आहे. आपण मेट्रो मध्ये दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक नियोजित केली आहे. मेट्रोचे जाळे इतर वाहतूक सेवेसोबत कसे जोडले जाईल याची काळजी आपण घेत आहोत. पर्यावरण संवर्धनासाठी आपण सायकल सुरू केली आहे. आणि इतर कामे देखील वेगाने सुरू आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मेट्रो रेल्वे आल्याने आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आता मेट्रो सूरू झाली की इतर वाहतुकीवर येणारा ताण कमी होईल. आता १४ मेट्रो मार्ग प्रस्तावित आहेत. यातील एक मेट्रो मार्ग कार्यान्वित झाला आहे. उर्वरीत मेट्रो मार्गाची कामे सुरू आहेत. काही मेट्रोचे डी पी आर बनविण्याचे काम सुरू आहे. भविष्यात आपला प्रवास सुखकर होणार आहे. पर्यावरणाचे संवर्धन होण्यास मदत होईल. 

दरम्यान, २०१४ साली घाटकोपर ते अंधेरी या मार्गावर मुंबई शहरांतील पहिली मेट्रो धावली. त्यांनतर सात वर्षानंतर मुंबईने नवीन मेट्रोचे स्वागत केले. आता या मेट्रोची वेगवेगळ्या आघाड्यांवर चाचणी होईल. त्यानंतर मे पासून प्रवाशांच्या सेवेत मेट्रो दाखल होईल. मेट्रो २ अ आणि ७ या मार्गावरील स्वदेशी बनावटीच्या पहिल्याच मेट्रो ट्रेनच्या (रोलिंग स्टाँक) निर्मितीचे काम बंगळुरू येथील भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल) प्रकल्प येथे सुरु आहे. 


--------------------

मेट्रो २ अ - दहिसर पूर्व ते डी. एन. नगर

मेट्रो ७ - अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व

--------------------

मेट्रोची वैशिष्ट्ये -

- सर्व कोच एसी आहेत.
- ऑटोमॅटीक दरवाजे आहेत.
- प्रवासी घसरून पडू नये यासाठी डब्यांचा अंतर्गत पृष्ठभाग अँटी स्किडींग आहे.
- प्रत्येक डब्यात सीसीटीव्हीची नजर असेल.
- प्रवाशांना मदत मागण्यासाठी प्रत्येक डब्यात स्विचही आहे.
- प्रत्येक डब्यात दोन सायकल ठेवण्याची व्यवस्था आहे.
- अपंग बांधवांना आपल्या व्हीलचेअरसह प्रवास करता यावा, यासाठी प्रत्येक डब्यात स्वतंत्र व्यवस्था आहे.

--------------------

- कमाल वेग मर्यादा ८० किमी प्रति तास असेल.
- मेट्रो स्वयंचलित पद्धतीने धावणार.
- वेग नियंत्रण व सुरक्षेसाठी व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी, ट्रेन कंट्रोल अँण्ड मँनेजमेंट सिस्टिमस आहे.
- प्रत्येक डब्यात ऑप्टिकल फायबरचे नेटवर्क आहे.
- डब्यांचे डिझाईन ऊर्जा संवर्धनाला प्राधान्य देणारे आहे.
 
--------------------

- प्रत्येक कोचसाठी ८ कोटी रुपये खर्च झाले.
- आंतरराष्ट्रीय स्तरावर कोचच्या निर्मितीसाठी १० कोटी रुपये खर्च येतो.
- ३७८ कोच टप्प्याटप्प्याने दाखल होणार.
- प्रत्येत ट्रेन ६ कोचची आहे.
- प्रत्येक कोचमध्ये ५२ प्रवाशांची आणि ३२८ प्रवाशांना उभे राहण्याची व्यवस्था आहे.
- एका डब्यात ३८० जणांचा प्रवास शक्य आहे.
- एका ट्रेनची प्रवासी क्षमता २२८० आहे.
- कोचच्या निर्मितीसाठी ३०१५ कोटी रुपये खर्च करण्यात आले.
- ९६ ट्रेन कार्यान्वितत करण्याचे नियोजन आहे.
- एकूण कोचची संख्या ५७६ पर्यंत वाढणार आहे.
- पहिल्या सहा ट्रेन येत्या सहा महिन्यांत दाखल होतील.
- दर महिन्याला तीन याप्रमाणे उर्वरित ट्रेन पुढल्या तीन वर्षांत येतील.

Web Title: Mumbai will change in the next two to four years - Chief Minister Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.