मुंबई : अभ्यासात सतत मागे, त्यात पुन्हा नववीतच बसावे लागणार असल्याच्या तणावातून १५ वर्षीय अस्मी चव्हाण हिने ३० व्या मजल्यावरून उडी घेत आयुष्य संपविल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. याप्रकरणी भांडुप पोलिस अधिक तपास करत आहे.
अस्मी मुलुंडच्या एका आंतरराष्ट्रीय शाळेत शिकत होती. वडिलांच्या निधनानंतर ती आईसोबत राहायची. अभ्यासात सतत कमी गुण मिळत असल्याने ती नैराश्येत होती.
तिच्या सोबतची मुले दहावी पास झाली. मात्र, याही वर्षी अभ्यासातील प्रगती पाहता शाळेने घटनेच्या एक दिवसापूर्वीच तिच्या आईला मेल पाठवला आणि तुमच्या मुलीला पुन्हा नववीत रिपिटर म्हणून ठेवावे लागेल, असे स्पष्ट केले.
मंगळवारी संध्याकाळी शाळेतील मित्राला भेटण्यासाठी भांडुपच्या एल. बी. एस. रोडवरील महिंद्रा स्प्लेंडर सोसायटीत गेली. सोसायटीच्या डी विंगमध्ये टेरेस असल्याने ते दोघेही तिथे गेले.
तिने अभ्यासामुळे नैराश्यात असल्याचे सांगितले असता मित्राने तिला समजावले. मात्र ती खूपच अस्वस्थ होती. त्यानंतर पायऱ्यांनी उतरत असताना तिने ३० आणि ३१ मजल्यामधील खिडकीतून उडी घेतली.