लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दक्षिण मुंबईतीलपाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेकडून शिवडी परिसरात महत्त्वाचे काम हाती घेण्यात येत आहे. भंडारवाडा टेकडी जलाशयाच्या मुख्य वाहिनीवर १,५०० मिमी. व्यासाचे दोन बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसविण्याचे काम बुधवार, २२ एप्रिलला सकाळी १०:०० ते गुरुवार, २३ एप्रिलला पहाटे ४:०० वाजेपर्यंत, असे १८ तास केले जाणार आहे. त्यामुळे ए, बी, सी, ई. आणि एफ दक्षिण विभागातील अनेक भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद, तर काही भागात कमी दाबाने पाणी मिळणार आहे.
भंडारवाडा, फॉसबेरी आणि गोलंजी टेकडी जलाशयांमधील पाणी वितरण अधिक सुरळीत आणि कार्यक्षम करण्यासाठी हे काम आवश्यक असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. ‘ए’ विभागात पी. डी’मेलो मार्ग, रामगड झोपडपट्टी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, सेंट जॉर्ज रुग्णालय, शासकीय दंत महाविद्यालय, आरबीआय आणि नौदल डॉकयार्ड परिसरात २२ एप्रिलला नियोजित वेळेत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.
‘बी’ विभागातील उमरखाडी, नूरबाग, चिंचबंदर, वालपाखाडी, जेल रोड, डॉ. महेश्वरी मार्ग, एल. टी. मार्ग, मशीद बंदर परिसरात २२ व २३ एप्रिलला विविध वेळांमध्ये पाणीपुरवठा बंद राहील. काही भागांमध्ये सकाळी, तर काही ठिकाणी सायंकाळी पाणीपुरवठा खंडित होणार आहे.
रुग्णालयांनाही कमी दाबाने पाणी
- ‘सी’ विभागात बोरा बाजार, इस्माइल कर्टे रोड, पाकमोडिया स्ट्रीट परिसरात २३ एप्रिलला पाणीपुरवठा बंद राहील. ‘ई’ विभागात नागपाडा, मदनपुरा, कामाठीपुरा, आग्रीपाडा, काळाचौकी, चिंचपोकळी, माझगाव, डॉकयार्ड रोड परिसरात काही भागांत पूर्ण बंद, तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. जेजे, नायर आणि कस्तुरबा रुग्णालयांनाही या काळात कमी दाबाने पाणी मिळणार आहे.
- ‘एफ दक्षिण’ विभागात शिवडी, वडाळा पूर्व, लालबाग, दादर, परळ, हिंदमाता, भोईवाडा, जेरबाई वाडिया मार्ग, आचार्य दोंदे मार्ग या भागात २२ व २३ एप्रिलला पाणीपुरवठा बंद किंवा कमी दाबाने होणार आहे. केईएम, टाटा, वाडिया आणि एमजीएम रुग्णालयांमध्येही या काळात कमी दाबाने पाणीपुरवठा राहील.
‘आवश्यक पाणीसाठा करा’
पालिकेने नागरिकांना आवश्यक पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर पुढील चार ते पाच दिवस पाणी उकळून, गाळून पिण्याचा सल्ला दिला आहे.
-------
Web Summary : Mumbai faces a major water cut as crucial valve work is undertaken. South Mumbai areas will experience an 18-hour water supply shutdown or reduced pressure. Hospitals will also face low water pressure. Residents are urged to store water and boil it before use.
Web Summary : मुंबई में महत्वपूर्ण वाल्व कार्य के चलते पानी की भारी कटौती होगी। दक्षिण मुंबई के इलाकों में 18 घंटे पानी की आपूर्ति बंद रहेगी या दबाव कम होगा। अस्पतालों में भी पानी का दबाव कम रहेगा। निवासियों से पानी जमा करने और उपयोग से पहले उबालने का आग्रह किया गया है।