आवश्यक देखभाल आणि दुरूस्तीच्या कामासाठी मुंबईतील काही भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली. हे काम गुरुवारी सकाळी ९.०० ते रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत पूर्ण केले जाईल, अशी अपेक्षा आहे. या कालावधीत वांद्रे आणि खारमधील अनेक भागांत पाणीपुरवठा तात्पुरता बंद केला जाईल. तर, इतर भागात पाण्याचा दाब कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले.
'या' भागांत पाणीपुरवठा राहणार बंद!बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, हनुमान नगर, लक्ष्मी नगर युनियन पार्क मार्ग क्रमांक १ ते ४, पाली हिल आणि च्युईम गावाचा काही भागात दुपारी २.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नर्गिस दत्त मार्ग, पद्मश्री देव आनंद मार्ग (जिग जॅग मार्ग) येथे रात्री १० ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाली माला मार्ग या भागात सकाळी १०.०० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
कोणत्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार?कांतवाडी परिसराचा काही भाग, पाली नाका, पाली गावठाण, शेरली, राजन आणि माला गावाचा काही भागात सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तर, खारदांडा कोळीवाडा, दांडपाडा, च्युईम गावठाण, गझधरबंध झोपडपट्टीचा काही भाग, खार पश्चिमेचा काही भागात सायंकाळी ५.३० ते रात्री १० वाजेपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली.