Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 07:13 IST2025-11-16T07:11:23+5:302025-11-16T07:13:16+5:30
Mumbai Byculla News: भायखळा (पश्चिम) येथील हन्स रोडवरील हबीब मॅन्शन परिसरात शनिवारी दुपारी सुरू असलेल्या इमारत बांधकामादरम्यान मोठी दुर्घटना घडली.

Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: भायखळा (पश्चिम) येथील हन्स रोडवरील हबीब मॅन्शन परिसरात शनिवारी दुपारी सुरू असलेल्या इमारत बांधकामादरम्यान मोठी दुर्घटना घडली. फाउंडेशन आणि पायलिंगचे काम सुरू असताना अचानक मोठ्या प्रमाणात माती आणि चिखल कोसळून पाच कामगार गाडले गेले. यापैकी दोन कामगारांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी आहेत. ही दुर्घटना दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास घडली.
दुर्घटनेनंतर बचावकार्य तत्काळ सुरू करून सर्व जखमी कामगारांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. पूनम यांनी दिलेल्या माहितीनुसार पाच जणांपैकी दोघांना रुग्णालयात आणताच मृत घोषित करण्यात आले, तर तीन जणांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. राहुल (३० वर्षे), राजू (२८ वर्षे), अशी मृत कामगारांची नावे आहेत. तर, साजीद अली (२५ वर्षे), शोबत अली (२८ वर्षे), लाल मोहम्मद (१८ वर्षे) यांची प्रकृती स्थिर आहे.
त्रुटींबाबत होत्या तक्रारी
घटनास्थळी भायखळा पोलिसांनी धाव घेत बचावकार्याला सुरुवात केली. माती का कोसळली, पायलिंगदरम्यान सुरक्षेचे आवश्यक उपाय केले होते का, याबाबत संबंधित विभागांकडून चौकशी सुरू आहे. स्थानिकांनी सांगितले की, या परिसरात सुरू असलेल्या बांधकामांमध्ये सुरक्षाविषयक त्रुटींबाबत आधीही तक्रारी आल्या होत्या. मात्र, त्यावर विकासकाकडून कोणतीही काळजी घेण्यात आली नाही. त्यामुळे अशी गंभीर घटना घडली, असा आरोप रहिवाशांनी केला.