मुंबई, ठाणे धरणक्षेत्रात धो-धो; ठाणे जिल्ह्यातील गावांना रेड अलर्ट, किती झाला पाणीसाठा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 09:15 IST2025-07-16T09:15:22+5:302025-07-16T09:15:35+5:30
मुंबई, ठाणे शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या माेडकसागर, अपर वैतरणा, मध्य वैतरणा धरणांतून विसर्ग सुरू झाल्याने या धरणांखालील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मुंबई, ठाणे धरणक्षेत्रात धो-धो; ठाणे जिल्ह्यातील गावांना रेड अलर्ट, किती झाला पाणीसाठा...
लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून, मुंबई, ठाणे शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या माेडकसागर, अपर वैतरणा, मध्य वैतरणा धरणांतून विसर्ग सुरू झाल्याने या धरणांखालील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणांच्या पाणलाेटात पावसाचा जाेर वाढल्यामुळे धरणातील साठ्यात झपाट्याने वाढ हाेत आहे.
भातसा धरणात मंगळवारी ६९ मिलिमीटर पाऊस झाला. आजपर्यंत या धरणात १४५७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नाेंद आहे. त्यामुळे धरणात ७७.५५ टक्के पाणीसाठा आहे. अपर वैतरणा धरणात ८४.७८ टक्के पाणीसाठा असून, धरणात आजपर्यंत १०७६ मिलिमीटर पाऊस झाला. या धरणाखालील इगतपुरीजवळील सॅचुर्ली, खर्डी, वैतरणा या नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर नदीच्या पाण्यात उतरण्यास मनाई करण्यात आली आहे.
मध्य वैतरणा धरणात मंगळवारी ९४.१६ टक्के पाणीसाठा असून, मंगळवारी या धरणक्षेत्रात ५७ मिलिमीटर पाऊस झाला. आजपर्यंत येथे १७२१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हे धरण जिल्ह्यातील कोचले या गावाजवळ असून, या गावासह परिसरातील आठ गावे आणि आदिवासी पाड्यांतील नागरिकांना नदी पात्रात उतरण्यास मनाई करण्यात आली आहे.
भातसा नदीजवळ मनाई आदेश
भातसा धरणाची पाणीपातळी मंगळवारी दुपारी १ वाजता १३४.१० मी. होती. सतत पडणाऱ्या पावसामुळे या धरणाचे दरवाजे (वक्रद्वारे) काही दिवसांत उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणातून सोडण्यात येणाऱ्या वाहत्या पाण्यात कुणीही जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आजूबाजूच्या गावातील रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याबाबत सर्व संबंधित यंत्रणांना तातडीचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी, ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे सीईओ संदीप माने यांनी दिले. ठाणे जिल्हा परिषद मुख्याधिकारी, पाेलिस अधीक्षक, एसडीओ, तहसीलदार आणि शहापूर, भिवंडी, कल्याण गटविकास अधिकारी यांनाही सतर्कतेचे आदेश आहेत. भातसा नदी तीरावरील विशेषतः शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगाव पूल तसेच सापगाव या गावांतील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक व रहिवाशांना परिस्थितीवर लक्ष देण्यास सांगितले आहे.