मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 16:42 IST2025-08-11T16:41:59+5:302025-08-11T16:42:40+5:30
Mumbai Dahi Handi Accident Death: सराव करताना सुरक्षा साधनांचा अभाव ११ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतला

मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
Mumbai Bal Govinda Dead:मुंबईतील दहिसर भागात एक धक्कादायक घटना घडली. दहीहंडीचा सराव करताना ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. पथकासोबत थर लावत असताना त्याचा तोल गेला आणि उंचावरून खाली पडल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये शोकाकूल वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेश रमेश जाधव असे ११ वर्षीय मृत मुलाचे नाव आहे. तो दहिसरच्या केतकीपाडा येथील रहिवासी होता.
महेश हा घटनेच्या दिवशी आपल्या गोविंदा पथकासोबत सराव करत होता. सराव करत असताना त्याला झेलण्यासाठी खाली फारशी माणसे नव्हती. तो थरावर चढत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट खाली कोसळला. उंचीवरून खाली पडल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. घडलेला प्रसंग गंभीर होता. त्यानंतर लगेचच धावपळ करून महेशला त्याच्या आसपासच्या मंडळींनी रूग्णालयात नेले. पण त्याच्यावर झालेला आघात इतका मोठा होता की, महेशला उपचार मिळण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, चिमुरड्या गोविंदांचा जीव धोक्यात घालणाऱ्या सराव पद्धतीतील बेजबाबदारपणावर टीका होत आहे.
तज्ज्ञांच्या मते, गोविंदानी दहीहंडीचा सराव करत असताना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, मॅट्रेस अशा काही महत्त्वाच्या सुरक्षा साधनांचा वापर करायलाच हवा. तसेच प्रशिक्षण देणारी व्यक्तीही योग्य देखरेख करणारी असावी. सुरक्षेत हयगय झाल्याने अशा गोष्टी घडतात. या पार्श्वभूमीवर नागरिक आणि सामाजिक संघटनांनी शासनाकडे मागणी केली आहे की, दहीहंडी सराव व स्पर्धांसाठी कठोर सुरक्षा नियमावली तयार करावी. जेणेकरून अशा घटना भविष्यात टाळता येतील.