Mumbai River Anthem: सरकारी जाहिरातीमध्ये मुख्यमंत्र्यांचा सपत्नीक अभिनय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 10:25 IST2018-02-26T08:53:14+5:302018-02-26T10:25:10+5:30
या रिव्हर अँथममधील 'स्टारकास्ट' सध्या भलताच चर्चेचा विषय ठरत आहे.

Mumbai River Anthem: सरकारी जाहिरातीमध्ये मुख्यमंत्र्यांचा सपत्नीक अभिनय
आपल्या विकासकामांची स्मार्ट पद्धतीने जाहिरात करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या भाजपा सरकारने मुंबईतील नद्यांच्या संवर्धनाविषयी जनजागृती करण्यासाठी 'मुंबई रिव्हर अँथम' तयार केले आहे. या रिव्हर अँथममधील 'स्टारकास्ट' सध्या भलताच चर्चेचा विषय ठरत आहे.
यु-ट्यूबवर हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. या गाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या मुख्य भूमिकेत दिसत आहेत. राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून अमृता फडणवीस यांनी अनेक उपक्रमांच्यानिमित्ताने आपल्या सुरेल आवाजाचा प्रत्यय उभ्या महाराष्ट्राला करून दिला होता.
अमृता फडणवीस आणि सोनू निगम यांनी हे रिव्हर अँथम गायले आहे. याशिवाय, या अँथममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई पालिका आयुक्त अजोय मेहता आणि अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी अभिनय केला आहे. मुंबईत पूर्वीच्या काळी असणाऱ्या नद्या आणि सध्या त्यांचे होत असलेले प्रदूषण यावर 'रिव्हर अँथमच्या'मधून प्रकाश टाकण्यात आला आहे.