Mumbai Rape Case: जाग आली तेव्हा बाजूला बसलेले होते दोन पुरूष, विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; स्ट्रगलिंग मॉडेलला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 14:52 IST2025-11-28T14:50:31+5:302025-11-28T14:52:43+5:30
मुंबईतील अंधेरीमध्ये एका महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर दोन जणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका मॉडेलला अटक केली आहे.

Mumbai Rape Case: जाग आली तेव्हा बाजूला बसलेले होते दोन पुरूष, विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; स्ट्रगलिंग मॉडेलला अटक
मुंबई : शीतपेयातून गुंगीकारक औषध दिल्यानंतर बेशुद्ध पडलेल्या २२ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी सुषमा राव (३१, रा. अंधेरी) या स्ट्रगलिंग मॉडेलला अटक केली आहे. सुषमाच्या या दोन साथीदारांनी विद्यार्थिनी बेशुद्ध पडल्यानंतर तिचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो काढल्याचा आरोप आहे. दरम्यान, तिच्या दोन फरार साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत.
पीडित विद्यार्थिनी सुषमाच्या कार्यालयात गरम मसाला उत्पादनांच्या मार्केटिंग विक्रीसाठी अर्धवेळ काम करत होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, अंधेरी पूर्वेतील जेबीनगर येथील एका लॉजमध्ये काही दिवसांसाठी भाड्याने घेतलेल्या खोलीत कार्यालय असेल, असे सुषमाने पीडितेला सांगितले होते. तेथे फक्त सुषमा आणि पीडिता काम करत होती.
अत्याचार करणाऱ्या दोघांचा शोध सुरू
सुषमाने काही दिवसांनी पीडितेला शीतपेयातून गुंगीकारक औषध दिल्यानंतर ती बेशुद्ध पडली. त्यानंतर सुषमाने तेथे बोलावलेल्या दोघांनी पीडितेवर अत्याचार केला. पीडितेला जाग आल्यावर तिला तिच्या शेजारी दोन पुरुष बसलेले आढळले.
सुषमाने पीडितेला तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ दाखवले. पीडितेने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर उशिरा अंधेरी पोलिसांना माहिती दिली.
परिमंडळ १० चे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंधेरी पोलिसांनी सुषमा आणि दोन अनोळखी पुरुषांविरुद्ध गुन्हा नोंदवला. या प्रकरणात पोलिसांनी सुषमाला अटक केली असून, तिच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.