राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला. मुंबईत येत्या २७ मे ८.३० वाजेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले.
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीसह रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. अंधेरी, दादर, भायखळा, चर्चगेट आणि मुंबई उपनगर यासारख्या प्रमुख भागात पाणी साचल्याची नोंद झाली. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून मुंबईत २७ मे २०२५ रोजी सकाळी ८:३० वाजेपर्यंत 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले.
मुंबईसह ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, २७ आणि २८ मेला रायगडात ऑरेंज अलर्ट देण्यात आले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांना २७ मेला रेड अलर्ट देण्यात आला आहे.