Mumbai Rains Updates : जो गरजता है ओ बरसता नहीं; ही म्हण पावसाने खोटी ठरविली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 12:05 PM2021-06-12T12:05:35+5:302021-06-12T12:06:35+5:30

Mumbai Rains Updates : हवामान खात्याने पुढील तीन तासांसाठी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला.

Mumbai Rain Update Waterlogging in parts of Mumbai due to heavy downpour | Mumbai Rains Updates : जो गरजता है ओ बरसता नहीं; ही म्हण पावसाने खोटी ठरविली

Mumbai Rains Updates : जो गरजता है ओ बरसता नहीं; ही म्हण पावसाने खोटी ठरविली

Next

सचिन लुंगसे

मुंबई : मुंबईकर साखर झोपेत असतानाच पुन्हा एकदा आकाशात अतिवृष्टीचे ढग दाटून आले. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला. सोबत जोरदार वाऱ्याने देखील हजेरी लावली. जणू काही निसर्ग मुंबईवर चाल करून आला आहे, असे वातावरण निर्माण झाले. आणि हो हो म्हणता शनिवारी सकाळी पावसाने मुंबईत तुफान राडेबाजी केली. 

मुंबई शहरापासून उपनगरा पर्यंत पहाटे सुरू झालेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. सकाळी ९ आणि सकाळी १० वाजता दादर पासून कुर्ला, सायन आणि घाटकोपर अशा ठिकाणी मुसळधार पावसाने आपली जोरदार बॅटिंग केली. या काळात मुंबईवर ढगांचा गडगडाट सुरुच होता. पावसाच्या टपोऱ्या थेंबांनी मुंबईला कवेत घेतले होते. विशेषतः मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाची भल्या पहाटेपासून जोरदार बॅटिंग सुरू होती.

 पूर्व आणि पश्चिम उपनगरात ठिकाणी झालेल्या पावसाने शनिवारी पहाटे शंभरी ओलांडली होती. सकाळी अकरा वाजेपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार सांताक्रूझ येथे १०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. याशिवाय पश्चिम उपनगरातल्या गोरेगाव आणि बोरीवली या ठिकाणांसोबत कुर्ला येथे देखील पाऊस जवळजवळ शंभरीच्या आसपास दाखल झाला होता. शतक पूर्ण करतानाच पावसाने टपोऱ्या थेंबांच्या माध्यमातून चौकार आणि षटकार लगावले होते.

 सकाळी दहा वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत कुर्ला आणि आसपासच्या परिसरात मुसळधार कोसळलेल्या पावसाने रस्त्यावर जणूकाही ओढे वाहत होते. पावसाचा तुफानी मारा सुरू असतानाच सकाळी पावणेअकराच्या सुमारास हवामान खात्याने पुढील तीन तासांसाठी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला. आणि पावसाने देखील हवामान खात्याचा शब्द तंतोतंत पाळत आपली हजेरी कायम ठेवली. सकाळी पावणे अकरा वाजता पुन्हा एकदा पावसाने तुफान मारा सुरु केला.

पावसाचा धिंगाणा सुरू असतानाच मुंबईच्या रस्त्यांवरील वाहनांच्या गर्दीचा महापूर मात्र कायम होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लालबहादूर शास्त्री मार्ग, कुर्ला अंधेरी रोड, चेंबूर लिंक रोड, दोन्ही एक्सप्रेस या प्रमुख मार्गावरून पाऊस वेगाने वाहू लागला. काही सखोल भागात पाणी साचले होते. म्हणून काही ठिकाणी वाहतूक धीम्या गतीने धावत होती. याच काळात मुंबईच्या रस्त्यांवर पावसाचा धिंगाणा सुरूच होता.

 सकाळी ११ वाजता यात आणखी भर पडली. आणि पाऊस तुफान सुरू झाला. मुंबईच्या रस्त्यांवर गर्दी कमी होऊ लागली. सुरू असलेल्या दुकानाकडे चिट पाखरू देखील फिरकेनासे झाले. याच काळात मुंबईचे नाले देखील पावसाच्या पाण्याने भरून वाहू लागले. सकाळी ११ वाजता पुन्हा एकदा ढगांचा गडगडाट सुरू झाला. अशा काहीशा वातावरणाने मुंबईकरांना धडकी भरली. विशेषतः सकाळी अकरा वाजता दाखल झालेला पाऊस तुफान फटके बाजी करत असल्याने मुंबईकरांना भरलेली धडकी वाढतच होती.

Web Title: Mumbai Rain Update Waterlogging in parts of Mumbai due to heavy downpour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app