Join us

पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 09:32 IST

पावसामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचले. किंग्स सर्कल, माटुंगा, सायन, भायखळा, महालक्ष्मी, पेडर रोड, कुर्ला, चेंबूरसह दक्षिण मुंबईतील सखल भागात पाणी साठले आहे

मुंबई -  रविवारी रात्रीपासूनच मुंबईसह परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून शहर आणि उपनगराला पावसाने अक्षरश: झोडपले आहे.  अंधेरी, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली भागात मुसळधार पाऊस असून शहरातील विविध भागात पाणी साचले आहे. त्यातच भारतीय हवामान खात्याकडून मुंबईला पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी करत पावसाचा इशारा दिला आहे.

पुढील ३ तासांत मुंबईत जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह ३० ते ४० किमी प्रती तास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. या आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १९१६ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन मुंबई महापालिकेने नागरिकांना केले आहे. जोरदार पावसामुळे मुंबईतील किंग्स सर्कल रेल्वे स्टेशन परिसरातही पाणी साचले आहे. 

मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत 

मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेन सेवांना पावसामुळे मोठा फटका बसला आहे. सेंट्रल आणि हार्बर लाईनवर विलंब होत असून चुनाभट्टी स्टेशनजवळ ट्रॅकवर पाणी साचल्याने काही काळ हार्बर सेवा विस्कळीत झाली होती. वडाळा येथे मोनोरेल तांत्रिक कारणाने बंद पडल्याने १७ प्रवासी अडकले होते. ज्यांना प्रशासनाने सुरक्षित बाहेर काढले. 

पावसामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचले. किंग्स सर्कल, माटुंगा, सायन, भायखळा, महालक्ष्मी, पेडर रोड, कुर्ला, चेंबूरसह दक्षिण मुंबईतील सखल भागात पाणी साठले आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी वाढली असून सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस सुरू झाला असून मागील दोन दिवसांपासून मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक भागात संततधार सुरूच आहे. आज (१५ सप्टेंबर) दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार असून, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश भागात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  पुढील ३ तासांत राज्यातील अहिल्यानगर, बीड, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांतील काही ठिकाणी ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. १६ सप्टेंबरलाही मुंबई, ठाणे, पालघर वगळता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज आहे. 

टॅग्स :पाऊसमुंबईचा पाऊसमुंबई लोकलहवामान अंदाजमुंबई महानगरपालिका