Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 19:33 IST2025-08-18T19:31:35+5:302025-08-18T19:33:12+5:30
Mumbai Rain News : कालपासून मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.

Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
Mumbai Rain News : मुंबईत मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईसह उपनगरांत मोठ्या प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झाली. उद्या मंगळवारीही हवामान विभागाने अतिसतर्कतेचा इशारा दिला आहे. यामुळे आता मुंबई महानगरपालिका अॅक्शन मोडवर आली आहे. प्रशासनाने उद्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
काल रात्रीपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू होता. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ऑफिसला जाणाऱ्यांना मनस्ताप झाल्याचे पाहायला मिळाले. पावसाचा जोर जास्त असल्यामुळे रेल्वेमार्गावर पाणी साचले. कुर्ला रेल्वे स्थानकातील रेल्वे रुळांवर पाणी साचायला लागल्याने चिंता वाढली आहे. दादर रेल्वे स्थानकातही पाणी साचले आहे. पुढील काही तास पाऊस सुरु राहिल्यास रेल्वे रुळ पाण्याखाली जाऊन कुर्ला स्थानकात मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प होण्याची शक्यता होती.
📢 मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालये यांना उद्या दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुटी !
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 18, 2025
🌧 भारतीय हवामान खात्याने उद्या मंगळवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई महानगरात (मुंबई शहर आणि उपनगरे) अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे.
🏫 या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर…
मुंबईत पावसाचा जोर जास्त होता. दरम्यान, आता मुंबईतील शाळांना उद्या मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत महापालिकेने आदेश काढला आहे. यामध्ये 'बृहन्मुंबई शहरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका परिक्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या प्राथमिक/माध्यमिक/खाजगी अनुदानित/विना अनुदानित शाळांच्या विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मंगळवार दि.१९.०८.२०२५ रोजी सुट्टी देण्यात येत आहे. मंगळवार, दि.१९.०८.२०२५ रोजी नियोजित असणारी सर्व प्रशिक्षणे, परीक्षा, इत्यादी नजीकच्या काळामध्ये आपल्या स्तरावर पूर्ण करण्याचे नियोजन करावे', असं म्हटले आहे.
कल्याण डोंबवली आणि ठाणे महापालिकेनेही सुट्टी जाहीर केली
उद्या मंगळवारी कल्याण डोंबवली महापालिकेनेही शाळांना सुट्टी जाहीर केली. तसेच ठाणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची मुसळधार सुरूच आहे. पुढील दोन दिवस अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला असून, महापालिकेने शाळा-महाविद्यालये आणि खासगी शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे.
सूचना…!!!! #kdmcupdatespic.twitter.com/Z2bkzZM5Nd
— कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC (@KDMCOfficial) August 18, 2025
मुंबई, पुणे, नाशिकला रेड अलर्ट
हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, सातारा, रायगड या जिल्ह्यांना अतिसतर्कतेचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. या जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, इतर भागातही मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे.