Mumbai Rain Alert IMD: हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे मुंबई आणि उपनगरांमध्ये गुरुवारी रात्रीपासून पावसाला सुरूवात झाली. शुक्रवारी पहाटेपासूनच मुंबईत पावसाचा जोर वाढला. मुसळधार पावासला सुरूवात झाल्याने त्याचा परिणाम लोकल रेल्वे सेवा आणि रस्ते वाहतुकीवर झाला. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे मार्गावरील गाड्या १५-२० मिनिटे उशिराने धावत आहेत. हवामान विभागाने मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात पुढील २४ तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून, 'महत्त्वाचे काम नसेल, तर घरीच थांबा', असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंबई आणि उपनगरांमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू असून, त्यामुळे मुंबईची गती मंदावली आहे. पावसाचा परिणाम मुंबई लोकल तसेच रस्ते वाहतुकीवरही झाला आहे. अंधेरी भुयारी मार्ग पाण्याखाली गेला असून, वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
मुंबईतील मुसळधार पाऊस, पहा व्हिडीओ
दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी आणि अंधेरी या भागातही मुसळधार पावसामुळे वाहतूक मंदावली आहे.
मुंबई आणि शेजारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबई आणि शेजारी जिल्ह्यातील लोकांनी महत्त्वाची कामे नसतील तर घराबाहेर पडणे टाळावे. त्याचबरोबर समुद्र किनारी जाऊ नये आणि वाहने काळजीपूर्वक चालवावीत, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेले असून, नागरिकांनी आपतकालीन परिस्थितीत मदतसाठी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा, असेही पोलीस प्रशासनाने म्हटले आहे.
पावसाचा मुंबई लोकल रेल्वे सेवेवर
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई मुसळधार पाऊस होत असल्याने मध्य रेल्वे मार्गावरून रेल्वे गाड्या १० ते १२ मिनिटे उशिराने धावत आहेत. त्याचबरोबर हार्बर मार्गावरील गाड्या ७-८ मिनिटे उशिराने धावत आहेत. मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून लोकल रेल्वे गाड्या उशिराने धावत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा उत्तर बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय असून, दुसरीकडे महाराष्ट्रापासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर वाढला असून, पुढील काही तासांत काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.