मुंबई पोलिसांची नवी कोरी गाडी भररस्त्यात पेटली! साकीनाक्यात थोडक्यात अनर्थ टळला; तांत्रिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 15:35 IST2026-03-27T15:31:51+5:302026-03-27T15:35:21+5:30
मुंबईत पोलीस दलात नुकत्याच दाखल झालेल्या नव्या कोऱ्या गाडीने पेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई पोलिसांची नवी कोरी गाडी भररस्त्यात पेटली! साकीनाक्यात थोडक्यात अनर्थ टळला; तांत्रिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Mumbai Police:मुंबई पोलीस दलाच्या ताफ्यात नुकत्याच दाखल झालेल्या अत्याधुनिक वाहनांपैकी एका गाडीला अंधेरीतील साकीनाका परिसरात अचानक आग लागली. ही घटना आग इतकी भीषण होती की आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले . सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आता या नव्या कोऱ्या गाड्यांच्या सुरक्षिततेबाबत आता मोठी चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांचे हे वाहन साकीनाका परिसरातून जात असताना अचानक त्यातून धूर निघू लागला. पोलीस कर्मचाऱ्यांच्या हे लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखून गाडी थांबवली. काही वेळातच आगीने संपूर्ण गाडीला विळखा घातला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग इंधनाच्या पाईपर्यंत पोहोचल्याने एक छोटा स्फोटही झाला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
गाडीतील चालकाला फोन आल्याने त्याने गाडीला बाजूला घेतली. मात्र तितक्यात धूर येऊ लागला. आग लागल्याचे पाहताच साकीनाक्यातील स्थानिक रहिवाशांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच नागरिकांनी पाणी आणि इतर साधनांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या सतर्कतेमुळे आग अधिक पसरण्यापासून रोखण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला. या वाहनामध्ये चालकाचे कपडे असलेली बॅग आणि मोबाईल जळून खाक झाला.
महिनाभरापूर्वीच झाले होते लोकार्पण
महत्त्वाचे म्हणजे, अवघ्या महिनाभरापूर्वी म्हणजेच २६ फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरिमन पॉईंट येथून मुंबई पोलिसांच्या ताफ्यात १२०० हून अधिक अत्याधुनिक वाहनांचे लोकार्पण केले होते. यामध्ये ६३३ चारचाकी आणि ६५७ दुचाकींचा समावेश होता. "या वाहनांमुळे पोलिसांची कार्यक्षमता वाढेल आणि प्रतिसाद देण्याचा वेग सुधारेल," असा विश्वास त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता.
तांत्रिक बिघाड की अन्य काही कारण?
महिनाभरातच ताफ्यातील नवीन गाडीला आग लागल्याने गाडीच्या गुणवत्तेवर शंका उपस्थित केली जात आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की इंधन गळतीमुळे, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुंबई पोलीस आणि संबंधित कंपनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत आहेत.