Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 10:21 IST2025-09-24T10:20:00+5:302025-09-24T10:21:52+5:30
Nusli Wadia News: मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती नुस्ली नेव्हिल वाडिया, त्यांची पत्नी मॉरीन, दोन मुले आणि इतरांविरुद्ध बांगूर नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती नुस्ली नेव्हिल वाडिया, त्यांची पत्नी मॉरीन, दोन मुले आणि इतरांविरुद्ध बांगूर नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरिवली महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. हे प्रकरण सुमारे ३० वर्षे जुने असून एका जमीन विवादाशी संबंधित आहे.
#BREAKING Mumbai police have registered an FIR against Nusli Wadia and six family members over a 30-year-old dispute with Ferani Hotels. The case involves alleged forgery and fabricated documents submitted in Bombay High Court in 2010 related to a Malad land development… pic.twitter.com/ujBrU0GWEy
— IANS (@ians_india) September 24, 2025
काय आहे नेमके प्रकरण?
हे प्रकरण मालाड येथील एका भूखंडाच्या विकासाशी संबंधित आहे. वाडिया आणि फेराणी हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात जमिनीच्या विकासासाठी एक करार झाला होता. या करारानुसार, फेराणी हॉटेल्स बिल्डर के. रहेजा यांच्या सहकार्याने ही जमीन विकसित करणार होती, ज्यातून वाडिया कुटुंबाला विक्रीच्या रकमेतून १२ टक्के वाटा मिळणार होता.
नुस्ली वाडियासह ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
फेराणी हॉटेल्सने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, २००८ मध्ये मालमत्तेच्या मालकी हक्कावरून हा वाद सुरू झाला. फेराणी हॉटेल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र चांदे यांनी आरोप केला आहे की, २०१० मध्ये मुंबई उच्च न्यायालयात वाडिया कुटुंबाने बनावट कागदपत्रे सादर केली. याच आरोपांवरून वाडिया कुटुंबासह एकूण सात जणांवर फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि आर्थिक फायद्यासाठी त्यांचा वापर करणे असे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. पोलिसांनी भारतीय दंड विधान (IPC) च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
महेंद्र चांदे यांनी १५ मार्च रोजी बांगूर नगर पोलीस ठाण्यात आणि २४ मार्च रोजी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी अखेर बोरिवली न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आता या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.