मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 17:41 IST2025-10-08T17:39:41+5:302025-10-08T17:41:34+5:30
Mumbai OneTicket: पीएम नरेंद्र मोदींनी आज Mumbai OneTicket App लॉन्च केले.

मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
Mumbai OneTicket: मुंबईकरांसाठी बुधवारचा(दि.8) दिवस ऐतिहासिक ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईकरांना मोठे गिफ्ट देत इंटिग्रेटेड कॉमन मोबिलिटी अॅप ‘Mumbai OneTicket’ चे उद्घाटन केले. या डिजिटल उपक्रमामुळे आता प्रवाशांना एकाच तिकिटावर मेट्रो, लोकल ट्रेन, बस, मोनोरेल आणि नवी मुंबई मेट्रोने प्रवास करता येणार आहे. म्हणजेच आता प्रत्येक प्रवासासाठी वेगळे तिकीट घेण्याची कटकट संपली!
काय आहे ‘Mumbai OneTicket’ ?
‘Mumbai OneTicket’ हे एक डिजिटल ट्रॅव्हल अॅप आहे, जे मुंबईतील सर्व प्रमुख सार्वजनिक वाहतूक साधनांना एकत्र आणते. या अॅपच्या मदतीने प्रवासी एकाच QR कोड तिकिटावर विविध वाहतूक साधनांतून प्रवास करू शकतील.
#Watch | PM @narendramodi launches ‘Mumbai One’, India’s first integrated mobility app for planning, booking, and paying across 11 public transport services, including Metro, monorail, suburban rail, and buses.
— DD News (@DDNewslive) October 8, 2025
Watch Live: https://t.co/Rs51xK2t90@PMOIndia@MIB_India@PIB_India… pic.twitter.com/lhjmoxaUTj
हे अॅप खालील नेटवर्क्सना कव्हर करेल:
मुंबई मेट्रो लाईन 2A, 7, 1 आणि 3 (अचार्य आत्रे चौक ते कफ परेड)
मुंबई मोनोरेल
नवी मुंबई मेट्रो
मुंबई उपनगरी रेल्वे (लोकल)
बेस्ट, ठाणे, मीरा-भायंदर, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महानगर परिवहन सेवा
हे अॅप ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) या डिजिटल फ्रेमवर्कवर आधारित आहे, ज्याद्वारे विविध ट्रान्सपोर्ट एजन्सी एका एकत्रित प्लॅटफॉर्मवर जोडल्या जातात.
अॅप कसे वापरायचे?
Google Play Store किंवा Apple App Store वरून ‘Mumbai OneTicket’ अॅप डाउनलोड करा.
मोबाईल क्रमांकाद्वारे साइन-अप करा.
सुरुवातीचे आणि अंतिम स्टेशन निवडा.
तिकिटांची संख्या भरा (एकावेळी ४ तिकिटे बुक करता येतात).
UPI, डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट करा.
पेमेंट झाल्यानंतर QR कोड तिकीट मिळेल, ज्याला मेट्रो गेटवर स्कॅन करून प्रवेश मिळेल.
रिअल-टाइम अपडेट्स आणि सुरक्षा फिचर्स
या अॅपमध्ये केवळ तिकीट बुकिंगच नाही, तर प्रवाशांसाठी रिअल-टाइम ट्रॅव्हल अपडेट्स, ट्रॅफिक डिले माहिती, पर्यायी मार्ग, तसेच आसपासच्या ठिकाणांचा नकाशा अशा अनेक स्मार्ट सुविधा दिल्या आहेत. त्यात एक SOS सुरक्षा फिचर देखील आहे, जे आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदतीसाठी अलर्ट पाठवेल.
या अॅपची का गरज होती ?
मुंबईचे सार्वजनिक वाहतूक जाळे वेगाने विस्तारतंय, परंतु वेगवेगळ्या ऑपरेटर्समुळे प्रवाशांना प्रत्येक प्रवासासाठी वेगवेगळे तिकीट घ्यावे लागत होते. त्यामुळे गोंधळ आणि वेळेचा अपव्यय दोन्ही वाढतो. ‘Mumbai OneTicket’ अॅपमुळे आता संपूर्ण प्रक्रिया डिजिटल, सुलभ आणि एकात्मिक झाली आहे.
मुंबई मेट्रो लाईन-3 चे उद्घाटन
याच कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबई मेट्रो लाईन-3 (फेज 2B) चे उद्घाटनही केले. ही लाईन अचार्य आत्रे चौक ते कफ परेड दरम्यान पसरलेली असून 33.5 किमी लांबीची पूर्णपणे भूमिगत मेट्रो आहे. या लाईनमध्ये २७ स्थानके असून ती दररोज सुमारे १३ लाख प्रवाशांची वाहतूक करेल. ही मेट्रो दक्षिण मुंबईतील आर्थिक आणि प्रशासकीय केंद्रांना (RBI, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, मंत्रालय इ.) थेट जोडते.