Goregaon Fire: गोरेगावच्या भगतसिंग नगरमध्ये घराला भीषण आग; एकाच कुटुंबातील तिघांचा गुदमरून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 10:10 IST2026-01-10T10:09:51+5:302026-01-10T10:10:31+5:30
Mumbai Fire News:

Goregaon Fire: गोरेगावच्या भगतसिंग नगरमध्ये घराला भीषण आग; एकाच कुटुंबातील तिघांचा गुदमरून मृत्यू
Mumbai Fire:मुंबईतील गोरेगाव पश्चिम परिसरात शनिवारी पहाटेच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. भगतसिंग नगर येथील एका घराला भीषण आग लागल्याने एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असून, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगावच्या भगतसिंग नगरमधील एका घराला पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की घरात झोपलेल्या कुटुंबाला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
आग लागली तेव्हा तिन्ही सदस्य गाढ झोपेत होते. आगीमुळे घरात मोठ्या प्रमाणावर धूर झाला आणि श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला. धुरामुळे गुदमरून या तिघांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अग्निशमन दलाने मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.
आगीचे कारण अस्पष्ट
घराला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबई पोलीस आणि अग्निशमन दल या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
मृत व्यक्तींची नावे:
संजोग नरेश पावसकर, हर्षदा संजोग पावसकर, कुशल संजोग पावसकर अशी मृतांची नावे आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी दिली माहिती.