Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 17:06 IST2025-05-09T17:03:27+5:302025-05-09T17:06:08+5:30
Mumbai Shocking News: आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
मुंबईतील ताडदेव परिसरात अत्यंत संतापजनक घटना घडली. पिझ्झा देण्याच्या बहाण्याने आठ वर्षाच्या चिमुकलीवर घरी नेऊन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी शेजाऱ्याला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ मे २०२५ रोजी आरोपीने पीडिताला पिझ्झा देण्याच्या बहाण्याने स्वत:च्या घरी नेले. त्यानंतर तिचे कपडे काढले आणि अश्लील व्हिडिओ दाखवून तिचा विनयभंग केला. घरी गेल्यानंतर पीडिताने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर पीडिताच्या आईने ताबडतोब ताडदेव पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेबाबत कळताच परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी स्थानिकांकडून मागणी केली जात आहे.
ताडदेव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता आणि आरोपी एकमेकांच्या शेजारी राहतात. आरोपीविरुद्ध ताडदेव पोलिस ठाण्यात विनयभंगासह पोक्सो कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. याआधी त्याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता.