Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 11:03 IST2025-07-16T11:01:30+5:302025-07-16T11:03:17+5:30
Mumbai Malad Civil Engineer Death मुंबईतील मालाड परिसरात इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून पडून एका अभियंत्याचा मृत्यू झाला.

Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू झाल्याची घटना मालाड पश्चिमच्या वळणाई परिसरात ७ जुलै रोजी घडली. ओमकार संख्ये (२४) असे मृताचे नाव असून त्याचे वडील विनोद संख्ये (६४) यांनी मालाड पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मालाड पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
ओमकार कनिष्ठ साइट इंजिनिअर म्हणून श्रीजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या विकसकासोबत श्री वैतीविनायक मंगलम एसआरए सोसायटीमध्ये काम करत होता. ७ जुलै रोजी तो इमारतीच्या दहाव्या माळ्यावर कामाची पाहणी करत असताना सहाव्या मजल्याच्या स्लॅबवर पडून गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे त्यांना कळवले गेले. मात्र, या घटनेत ओमकारच्या डोक्याला मोठी इजा झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
विकसकाने कामगार व साइट अभियंता यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली सुरक्षा जाळी, सेफ्टी बेल्ट, हेल्मेट आणि अन्य कोणतीही साधने पुरवली नाहीत. या निष्काळजीमुळे मुलाचा जीव गेला, असे ओमकारच्या वडिलांचे म्हणणे आहे. या ठिकाणी लोखंडी वॉकवे जाळी स्लॅबवर योग्यरीत्या न बसवता कोणत्याही आधाराशिवाय एका बाजूने स्लॅबवर ठेवण्यात आली होती. याप्रकरणी मालाड पोलिसांनी तपास सुरू केला.