राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 17:04 IST2025-12-19T17:02:04+5:302025-12-19T17:04:43+5:30
Mumbai Municipal Elections: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचा शिवसेना उबाठा आणि राज ठाकरे यांचा मनसे हे पक्ष एकत्र लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे. ठाकरे बंधू हे मुंबईतील मराठीबहुल आणि मुस्लिम बहुल असलेल्या सुमारे ११३ वॉर्डवर विशेष लक्ष देणार असून, त्यासाठी त्यांचा जागावाटपाचा ‘MaMu’ फॉर्म्युलाही निश्चित झाल्याचे वृत्त आहे.

राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचा शिवसेना उबाठा आणि राज ठाकरे यांचा मनसे हे पक्ष एकत्र लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे. अनेक वर्षांपासूनचा दुरावा मिटवून दोन्ही भाऊ मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र आलेल आहेत. दोन्ही पक्षांमध्ये मुंबई महानगपालिका निवडणुकीसाठीचं जागावाटपही जवळपास निश्चित झालं आहे. याचदरम्यान, ठाकरे बंधू हे मुंबईतील मराठीबहुल आणि मुस्लिम बहुल असलेल्या सुमारे ११३ वॉर्डवर विशेष लक्ष देणार असून, त्यासाठी त्यांचा जागावाटपाचा ‘MaMu’ फॉर्म्युलाही निश्चित झाल्याचे वृत्त आहे.
शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमधील जागावाटपाबाबत मिळत असलेल्या माहितीनुसार मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत MaMu म्हणजेच मराठी आणि मुस्लिम मतदारांचं समीकरण साधण्याचा प्रयत्न ठाकरे बंधूंकडून केला जाणार आहे. त्यानुसार मुंबईतील एकूण २२७ प्रभागांपैकी मराठीबहूल असलेल्या ७२ आणि मुस्लिम बहूल असलेल्या ४१ प्रभागांवर विशेष लक्ष दिलं जाणार आहे.
गरवर्षी २०२४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईतील भायखळा, माही, मानखूर्द, गोवंडी अशा मुस्लिम बहूल भागांमधून शिवसेना ठाकरे गटाला भरभरून मतदान झालं होतं. त्यामुळे अटीतडीच्या लढतीत शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे पारंपरिक मराठी मतांसोबत नव्याने जोडला गेलेला मुस्लिम मतदार टिकवण्यासाठीही ठाकरे बंधूंकडून मोर्चेबांधी केली जात आहे.
याबरोबरच शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमधील जागावाटपाच्या सध्याच्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेना ठाकरे गट १४० ते १५० तर मनसे ६० ते ७० जागांवर लढण्याची शक्यता आहे. मात्र मराठी मतदारांची लक्षणीय संख्या असलेल्या वरळी, दादर-माहीम, शिवडी आणि विक्रोळी-भांडूप आदी भागातील जागांच्या वाटपावरून घोडं अडलं आहे. हा भाग दोन्ही पक्षांचं प्रभाव क्षेत्र असल्याने येथील अधिकाधिक जागांवर दोन्ही पक्षांकडून दावा केला जात आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे मुंबईतील अल्पसंख्याक मतदारांना आपल्यासोबत ठेवण्याच्या रणनीतीवर काम करत आहेत. तर राज ठाकरे हे आपल्या आक्रमक आणि जोशपूर्ण भाषणांमधून मराठी अस्मिता चेतवून मराठी मतदारांना या युतीकडे वळवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. तसेच दोन्ही पक्षांमधील ऐक्याचा संदेश देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मुंबईमध्ये तीन संयुक्त सभा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.