Chhath Puja 2025: छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढांसह भाजपा नेते घेणार तयारीचा आढावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 16:52 IST2025-10-23T16:51:24+5:302025-10-23T16:52:30+5:30
Mumbai Chhath Puja 2025: शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून मंत्री लोढा आणि मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम जुहू चौपाटीपासून दौऱ्याला सुरुवात करतील

Chhath Puja 2025: छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढांसह भाजपा नेते घेणार तयारीचा आढावा
मुंबई - शहर आणि उपनगर परिसरात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय लोक राहतात. त्यामुळे येत्या २७ आणि २८ ऑक्टोबरला मुंबईत छट पूजा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने मुंबई महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम पाहणी दौरा करणार आहेत. मुंबई महापालिकेकडून छटपूजेनिमित्त येणाऱ्या लोकांसाठी विविध सुविधा देत असते.
शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून मंत्री लोढा आणि मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम जुहू चौपाटीपासून दौऱ्याला सुरुवात करतील. त्यानंतर वरळी जांबोरी मैदान, दक्षिण मुंबईतील बाणगंगा येथेही सुरु असलेल्या तयारीची पाहणी करण्यात येईल. मुंबईतल्या समुद्री किनारी आणि तलाव परिसरात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय छट पूजेचा उत्सव साजरा करतात. त्यावेळी लोकांना विविध सुविधा मिळाव्यात यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर मंत्री लोढा आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी संयुक्तरित्या मुंबई महापालिका मुख्यालयात पूर्व तयारी आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी छट पूजा उत्सव समितीचे ५५ प्रतिनिधी ही उपस्थित होते.
मुंबईतल्या साधारण ६० ठिकाणी पूजेचे आयोजित करण्यात येत असून पूजा स्थळावर पिण्याचे पाणी, प्रकाश झोत, पूजेसाठी टेबल, वाहतूक नियंत्रण, शौचालये आणि महिला भाविकांना पूजेनंतर कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्या उभारण्यात येत आहेत. या सर्व सुविधांची पाहणी भाजपा नेत्यांकडून करण्यात येणार आहे. यावेळी पूजा उत्सव समित्यांच्या प्रतिनिधींच्या आणखी काही सूचना असतील तर तात्काळ महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना उचित कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येतील असेही मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उत्सवावेळी भाविकांसाठी शहरातील मेट्रो आणि बेस्ट बस सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भात ही मेट्रो आणि बेस्ट परिवहन सेवेच्या अधिकाऱ्याकडून माहिती घेतली जाणार आहे. मुंबई परिसरात रात्री उशिरापर्यंत छटपूजेकरीत मोठ्या संख्येने भाविक एकत्रित येतात अशा वेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त सह पूजा स्थळी सीसीटीव्ही लावण्याची सूचना आधीच करण्यात आली आहे.