नालेसफाईचे दावे गेले वाहून; वाहतूक खोळंबली नाही, याचे प्रशासनाला कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 21:35 IST2021-06-09T21:31:44+5:302021-06-09T21:35:56+5:30
Mumbai Heavy Rain : मुंबईत पालिकेनं केला होता १०४ टक्के नालेसफाईचा दावा. मुंबईतील अनेक भागांमध्ये साचलं होतं पाणी.

नालेसफाईचे दावे गेले वाहून; वाहतूक खोळंबली नाही, याचे प्रशासनाला कौतुक
मुंबईत १०४ टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याचा पालिका प्रशासनाचा दावा बुधवारी पहिल्याच मुसळधार पावसात वाहून गेला. मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी तुंबले. मात्र पाणी तुंबले तरी कुठेही वाहतुकीचा खोळंबा झाला नाही, असा दावा करीत पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेने आपली पाठ थोपटून घेतली.
मुंबईतील नाल्यांची सफाई पूर्ण झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने मंगळवारीच केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बुधवारी मुसळधार पावसाने पालिकेचे दावे फोल ठरवले. मुख्य सहा पर्जन्य जल उदंचन केंद्रांनी सात ते आठ तास कार्यरत राहून पावसाळी पाण्याचा निचरा केला. या कामगिरीमुळे मुंबईत पूरस्थिती टाळण्याची मोलाची कामगिरी बजावली गेली. तसेच रस्ते वाहतुकीवर देखील विशेष परिणाम जाणवला नाही, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
या भागात सर्वाधिक पाऊस....
बहुतांश ठिकाणी सकाळी ८ ते दुपारी ३ या कालावधीत, ४ ते ५ तासांमध्येच जोरदार पावसाची नोंद आली. चेंबूर २९७ मिमी, विक्रोळी २७४ मिमी, रावली कॅम्प २५९ मिमी, एम/पूर्व विभाग २५८ मिमी, धारावी अग्निशमन केंद्र परिसर २५६ मिमी, सांताक्रूझ कार्यशाळा परिसर २४९ मिमी आणि विलेपार्ले २४० मिमी येथे सर्वाधिक पाऊस झाला. सकाळी ११.४५ वाजता समुद्रात ४.१६ मीटर उंच लाटांची भरती होती. सकाळी ७ ते ८ वाजेदरम्यान संपूर्ण महानगरात ४५ पंप पाण्याचा निचरा करत होते. तर दुपारी १ ते २ दरम्यान १९७ पंप सुरु होते.
पंपिंग स्टेशनचा दिलासा...
मुंबईतील सहा पंपिंग स्टेशन सतत कार्यरत ठेवून पावसाचे पाणी समुद्रामध्ये जलदगतीने निचरा करण्यात आले. सकाळी ८ वाजता हाजी अली उदंचन केंद्रात ३, क्लिव्हलँड आणि लव्हग्रोव्ह उदंचन केंद्रात २ तर ब्रिटानिया उदंचन केंद्रात एक पंप सुरु होता. पावसाचा जोर वाढल्यानंतर इर्ला उदंचन केंद्रात ८, गजदरबंध आणि लव्हग्रोव्ह केंद्रात ६ तर ब्रिटानिया आणि हाजी अली उदंचन केंद्रात ३ पंप पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आले. या कामगिरीमुळे मुंबई महानगरात पूर स्थिती ओढवली नाही, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.