मोबाइल सिग्नल वृद्धीसाठी मुंबई मेट्रोच्या आयबीएस सेवेचे दर दूरसंचार कंपन्यांना अमान्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 11:31 IST2025-04-20T11:29:11+5:302025-04-20T11:31:22+5:30
ॲसेसच्या आयबीएस नेटवर्कला कनेक्टिव्हिटी देण्यासाठी कंपन्या स्वत:ची उपकरणे स्थापन करणार आहेत.

मोबाइल सिग्नल वृद्धीसाठी मुंबई मेट्रोच्या आयबीएस सेवेचे दर दूरसंचार कंपन्यांना अमान्य
नवी दिल्ली : मुंबई मेट्रोची भूमिगत स्थानके आणि बोगद्यांत मोबाइल सिग्नल वाढीसाठी पुरविण्यात येणाऱ्या ‘इन-बिल्डिंग सोल्युशन्स’ (आयबीएस) सेवेच्या दरावरून मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ (एमएमआरसीएल) आणि सेवा पुरवठादार दूरसंचार कंपन्या यांच्यात मतभेद झाले आहेत.
‘एमएमआरसीएल’ने निवडलेली भागीदार कंपनी ‘ॲसेस’ने प्रस्तावित केलेला दर मान्य नसल्याचे पत्र रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया कंपन्यांनी ‘एमएमआरसीएल’ला पाठविले आहे.
७ एप्रिल रोजी पाठविण्यात आलेल्या पत्रात दूरसंचार कंपन्यांनी म्हटले आहे की, “तुम्ही निवडलेला भागीदार ‘ॲसेस’ने प्रस्तावित केलेल्या अव्यवहार्य दरात आयबीएस सेवा पुरविणे शक्य नाही.”
मेट्रो रेल्वेत प्रवाशांना विनाअडथळा मोबाइल सेवा मिळावी यासाठी तिन्ही दूरसंचार कंपन्यांकडून आयबीएस सेवा घेतली जाणार आहे.
ॲसेसच्या आयबीएस नेटवर्कला कनेक्टिव्हिटी देण्यासाठी कंपन्या स्वत:ची उपकरणे स्थापन करणार आहेत. ॲसेस आणि कंपन्यांत रीतसर करार होत नाही, तोपर्यंत ही सेवा मोफत मिळेल.
‘एमएमआरसीएल’च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांच्या नावे कंपन्यांनी हे पत्र पाठविले आहे. यासंबंधी रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांना ईमेल पाठवला.