अश्विनी भिडेंना 'खास उपाधी' देत मेट्रो रेल परिवारानं केला मानाचा मुजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 02:51 PM2020-01-25T14:51:38+5:302020-01-25T15:22:25+5:30

अश्विनी भिडे यांच्या कार्याला मुंबई मेट्रो रेल परिवाराने सलाम केला आहे. 

Mumbai Metro Rail Salute Ashwini Bhide for the metro work | अश्विनी भिडेंना 'खास उपाधी' देत मेट्रो रेल परिवारानं केला मानाचा मुजरा

अश्विनी भिडेंना 'खास उपाधी' देत मेट्रो रेल परिवारानं केला मानाचा मुजरा

googlenewsNext
ठळक मुद्देअश्विनी भिडे यांच्या कार्याला मुंबई मेट्रो रेल परिवाराने सलाम केला आहे. पत्र लिहून मुंबई मेट्रो रेल परिवाराने भिडे यांच्या कार्याला मुजरा केला आहे. 'प्रभावशाली कार्यशैली, उत्कृष्ट प्रशासक, कणखर नेतृत्व आणि अजोड गुणवत्ता असलेल्या 'मेट्रो वूमन'ला मानाचा मुजरा'

मुंबई -  राज्यातील ठाकरे सरकारने सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांना मेट्रो-3 च्या संचालक पदावरुन हटवले आहे. त्यांच्या जागी रणजितसिंह देओल यांची नेमणूक करण्यात आली आहे. भिडे यांचा मेट्रो-3 च्या संचालक पदाचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये पूर्ण झाला होता. मात्र त्यांना सरकारकडून कार्यकाळ वाढवून देण्यात आलेला नाही. त्यामुळे आता भिडे यांच्याकडे कोणती जबाबदारी दिली जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  दरम्यान अश्विनी भिडे यांच्या कार्याला मुंबई मेट्रो रेल परिवाराने सलाम केला आहे. भिडेंना 'मेट्रो वूमन' ही खास उपाधी देत मेट्रो रेल परिवाराने मानाचा मुजरा केला आहे.

'2015 पासून आपण मेट्रो-3 या प्रकल्पासाठी काम करत आहात. हा प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यासाठी आपल्या चित्तात अखंड तेवणारी ध्येयवादाची ज्योत आणि अतिशय कमी प्रमाणात मनुष्यबळ असलेली प्रारंभीची सामग्री हाती घेऊन आपण फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली. अतिशय तुटपुंजे मनुष्यबळ हाती घेऊन हे विकासकाम करणे कसोटी पाहणारे होते. पण आपण खंबीर राहिलात. प्रकल्प पुढे कसा जाईल यासाठी योजना आखून त्या कार्यान्वित करण्यात आपण आनंद मानला. हे अतिशय स्पृहणीय आहे. मेट्रो-3 प्रकल्पाचे काम करत असताना आपल्यापाशी अहंकाराचा लवलेश फिरकला नाही. मी हे केलं म्हणण्यापेक्षा माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीनं ही कामे झाली आणि होत आहेत, असं म्हणत संघभावना जोपासली' असं पत्र लिहून मुंबई मेट्रो रेल परिवाराने भिडे यांच्या कार्याला मुजरा केला आहे. 

'कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो पण अनेक संकटांशी सामना करून मिळवलेला विजय हा इतिहास घडवतो. आपले अष्टपैलू व्यक्तीमत्त्व, मनमिळावू वृत्ती, काम करण्याची जिद्द, कामाप्रतीचा प्रमाणिकपणा आणि प्रचंड मेहनतीची तयारी या गुणांचा आदर्श घेऊन संस्थेतील अधिकारी आणि कर्मचारी त्या प्रेरणेने घडू लागले. आपण शून्यातून मेट्रो -3 प्रकल्पाचं विश्व निर्माण केले. अशा प्रभावशाली कार्यशैली, उत्कृष्ट प्रशासक, कणखर नेतृत्व आणि अजोड गुणवत्ता असलेल्या 'मेट्रो वूमन'ला मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कुटुंबातील सदस्यांकडून मानाचा मुजरा' असं म्हणत भिडे यांच्या कामाला सलाम केला आहे. 

डिसेंबर अखेरीस ठाकरे सरकारने अश्विनी भिडेंना प्रधान सचिवपदी बढती दिली. याशिवाय एमएमआरसीएल आणि मेट्रो-3 चं संचालकपदही त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आलं. आरे येथील मेट्रो-3 च्या कारशेडच्या मुद्द्यावरून अश्विनी भिडे आणि शिवसेना यांच्यात तीव्र मतभेद झाले होते. मात्र तरीही भिडे यांना पदोन्नती देण्यात आल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. मात्र काही दिवसांनी ठाकरे सरकारने 20 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. सरकारने मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी रणजितसिंह देओल यांची नेमणूक केली आहे. 

Important Order of the High Court of Metro-3 | रात्रीच्या वेळी बंद राहणार मुंबई मेट्रो-3 चे काम

मुंबईतील आरे कारशेडमधील वृक्षतोडीवरून वाद झाल्यानंतर मेट्रो-3 च्या संचालक असलेल्या अश्विनी भिडे यांना शिवसेनेने लक्ष्य केलं होतं. आरे येथील कारशेड अन्यत्र हलवल्यास प्रकल्पच होणार नसल्याची भूमिका मेट्रो प्रशासनानं घेतली होती. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी अश्विनी भिडेंवर जोरदार टीका केली होती. 'अश्विनी भिडे व त्यांच्या अन्य अधिकाऱ्यांना ‘आरे’च्या कारशेडशिवाय मेट्रो प्रकल्प पूर्ण करता येणार नसेल, तर अशा अधिकाऱ्यांना बाजूला करावं. त्यांच्या जागी सक्षम व मुंबईकरांना विश्वासात घेऊन काम करणाऱ्यांकडे प्रकल्प द्यावा, अशी मागणीही आदित्य यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. 

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राच्या मनात वेगळीच भीती; कोरेगाव भीमा NIA चौकशीवर शरद पवारांना संशय

उद्धव ठाकरे, प्रभू रामचंद्र प्रश्न विचारतील तेव्हा काय उत्तर द्याल?; मनसेचे चोख प्रत्युत्तर

चलो अयोध्या! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'या' दिवशी घेणार रामलल्लाचं दर्शन

शिवसेनेचे आदित्य विरुद्ध मनसेचे अमित; दोन युवा ठाकरेंच्या वाटचालीकडे लक्ष

'हिंदुत्व पेलणे हा येरागबाळ्यांचा खेळ नाही'; सामनातून 'मनसे'वर टीकास्त्र

 

Web Title: Mumbai Metro Rail Salute Ashwini Bhide for the metro work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.