Mumbai Metro 3: भुयारी मेट्रो दुसऱ्या दिवशीही सुसाट; अनेक स्थानकांत प्रवाशांची अलोट गर्दी, बेस्टचे काय झाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 09:54 IST2025-10-11T09:54:09+5:302025-10-11T09:54:24+5:30
Mumbai Metro 3: आरे ते कफ परेड हा मेट्रो ३ चा संपूर्ण मार्ग प्रवासी सेवेत दाखल झाला आहे. त्यातून पश्चिम उपनगरात जाणाऱ्या प्रवाशांना आता नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.

Mumbai Metro 3: भुयारी मेट्रो दुसऱ्या दिवशीही सुसाट; अनेक स्थानकांत प्रवाशांची अलोट गर्दी, बेस्टचे काय झाले?
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोचा शेवटचा टप्पा सेवेत दाखल झाल्यानंतर या सेवेला प्रवाशांची मोठी पसंती मिळत आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी रात्री ९ वाजेपर्यंत या मेट्रोवरून १ लाख ५९ हजार १०५ जणांनी प्रवास केला आहे. दुसऱ्या दिवशीही प्रवासी संख्या वाढतीच असल्याने लवकरच ही मेट्रो मार्गिका दोन लाख प्रवाशांचा टप्पा पार करेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
आरे ते कफ परेड हा मेट्रो ३ चा संपूर्ण मार्ग प्रवासी सेवेत दाखल झाला आहे. त्यातून पश्चिम उपनगरात जाणाऱ्या प्रवाशांना आता नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. तसेच दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीतून वाट काढण्याऐवजी, तसेच बस आणि शेअर टॅक्सीसाठी रांगेत उभे राहण्याऐवजी प्रवासी या सेवेचा पर्याय वापरताना दिसत आहेत. ही सेवा सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी गुरुवारी दिवसभरात तिच्यातून १ लाख ५६ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. या दिवशी कार्यालयातून घरी निघालेल्या प्रवाशांनी विधानभवन मेट्रो स्थानकावर मोठी गर्दी केली होती. त्यातून स्थानकाचे प्रवेशद्वार १० मिनिटांसाठी बंद करावे लागले होते.
आरे - कफ परेड मोट्रो मार्गिकेवर शुक्रवारीही मोठी गर्दी दिसून येत होती. विधानभवन, सीएसएमटी या स्थानकांवर अलोट गर्दी होती. कफ परेड, विधानभवन येथील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी चर्चगेट आणि सीएसएमटीला जाण्यासाठी या सेवेचा पर्याय निवडला.
तिकिटासाठी रांगा
कफ परेड, विधानभवन सीएसएमटी स्थानकांत प्रवाशांच्या तिकिटासाठी शुक्रवारीही रांगा लागल्या होत्या. स्थानकात नेटवर्क उपलब्ध नसल्याने प्रवाशांना खिडकीवरून तिकीट काढण्याशिवाय पर्याय नव्हता. तसेच प्रवासी संख्या अधिक असल्याने गर्दीच्या वेळी या मार्गावर गाडी भरून धावत होती. त्यातून अनेकांना उभे राहूनच प्रवास करावा लागत होता. दरम्यान, अनेकांनी मेट्रो पाहण्यासाठीही प्रवास केला. त्यातूनही काही प्रमाणात प्रवासी वाढले होते.
बेस्टला फटका
मुंबई मेट्रो लाईन-३ मुळे दक्षिण मुंबईतील बेस्ट बसच्या महत्त्वाच्या मार्गांवरील प्रवासी संख्या तब्बल २१ टक्क्यांपर्यंत घसरल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बॅकबे व कुलाबा हे दोन्ही डेपो मिळून ३,६०० प्रवाशांची घट झाली.
कुलाबा आगार
८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रवासी: ५३,४९६
९ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रवासी: ५०,११२
एकूण फरक : ३,३८४ प्रवाशांची घट